Pune Festival | पुणे फेस्टिव्हलमध्ये ‘नृत्य झंकार’ स्पर्धा ! मा. स्वाती दैठणकर यांना ‘नृत्यगुरू’ पुरस्कार
Pune Festival | पुणे फेस्टिव्हलतर्फे ‘नृत्य झंकार’ हि महिलांची नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. हि स्पर्धा शनिवार, दि. १७ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे संपन्न होईल. यामध्ये ज्येष्ठ भरतनाट्य नृत्यगुरू स्वाती दैठणकर यांना पुणे फेस्टिव्हल ‘नृत्यगुरू पुरस्कर’ देऊन गौरवले जाणार आहे. पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल हे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहे. पुणे फेस्टिव्हलच्या चेअरपर्सन मीरा सुरेश कलमाडी, मुख्य संयोजक अॅड अभय छाजेड, सांस्कृतिक कार्यक्रम मुख्य संयोजक व सेक्रटरी डॉ. सतीश देसाई याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती पुणे फेस्टिव्हल नृत्य झंकार स्पर्धा आयोजक संयोगिता कुदळे यांनी दिली.
डॉ. स्वाती दैठणकर आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या भरतनाट्यम् नृत्यांगना आहेत. त्या मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर असून संपूर्ण विद्यापीठामध्ये सर्व प्रथम आल्याबद्दल त्यांना सुवर्ण पदक व विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले.भारत सरकारची राष्ट्रीय शिष्यवृत्ती तसेच संशोधन शिष्यवृत्ती त्यांना मिळालेली आहे. त्यांच्या नृत्ययोग विषयावर आधारे युनिव्हर्सिटी मध्ये चार वर्षांचा डिग्री कोर्स सुरू झाला असून हा सन्मान लाभलेल्या त्या पहिल्याच नर्तिका ठरल्या आहेत. सध्या डॉ. डी. वाय. पाटील युनिवर्सिटी मध्ये त्या पर्फोरामिंग आर्ट्सच्या प्रमुख म्हणून पदभार सांभाळीत आहेत.
या पुणे फेस्टिव्हल नृत्य झंकार स्पर्धेत एकल आणि समूह नृत्य अशा दोन प्रकारांचा समावेश आहे. एकल नृत्य स्पर्धा २० ते ३५ आणि ३६ ते ५० वर्षे अशा दोन वयोगटांत होणार आहे. समूह नृत्य स्पर्धेसाठी २० ते ५५ वर्षे हा वयोगट असून, प्रत्येक समूहात ५ ते ८ महिला स्पर्धक सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत बॉलीवूड, लावणी, कथ्थक, फ्युजन आदी विविध नृत्यप्रकारांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.
स्पर्धेच्या परीक्षक म्हणून अभिनेत्री पूजा वाघ आणि नृत्यदिग्दर्शक, लेखक व निवेदक जतीन माया पांडे काम पाहणार आहेत. ‘मिस पुणे २०२६’ आकृती शृंगारे आणि चतु:शृंगी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शीतल जाधव यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
स्पर्धेतील एकल आणि समूह नृत्य या दोन्ही प्रकारांत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेनंतर लगेचच पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे.
