Mumbai Police News | चार दिवसांपूवीच बाबा झाले, फॅमिलीला मुंबईत आणण्यासाठी घराचा शोध; पण… पोलीस बापाचा मृतदेह पाहून सारेच गहिवरले
मुंबई : Mumbai Police News | मुंबई पोलीस दलातून एक दुःखद घटना समोर येत आहे. सशस्त्र दलात कार्यरत असलेल्या रवींद्र बाळासाहेब हाके Ravindra Balasaheb Hake (वय-२८) यांचा रविवारी (दि.११) अकाली मृत्यू झाला. चारच दिवसांपूर्वी बाबा झालेले हाके प्रचंड आनंदात होते. तान्हुल्या बाळाला मुंबईत आणण्याची तयारी त्यांनी सुरु केली होती. त्यासाठी त्यांनी मुंबईत घराचा शोध सुरु केला. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होते.
भाड्याने राहण्यासाठी घर पाहायला जात असतानाच हाकेंचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने पोलीस वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे. हाके मूळचे पुण्याच्या इंदापूरातील मदनवाडीचे रहिवासी होते. वर्षभरापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. चारच दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नीनं बाळाला जन्म दिला.
बाबा म्हणून ‘प्रमोशन’ मिळालेले हाके खूप आनंदात होते. पत्नी आणि बाळासोबत अधिकाधिक वेळ घालवता यावा यासाठी त्यांनी कामापासून जवळच भाड्याने राहण्यासाठी घराचा शोध सुरु केला.
कांजूर म्हाडा वसाहतीत राहणाऱ्या मित्राला रविंद्र हाकेंनी रविवारी कॉल केला. आपण घर पाहायला येणार असल्याचे हाकेंनी कळवले. रात्रपाळीचे काम संपवून हाके रविवारी सकाळी कांजूर स्थानकात उतरले. मेगाब्लॉक असल्याने प्रवाशांची गर्दी होती. लोकल उशिराने धावत असल्याने गर्दी वाढत चालली होती.
लोकल उशिराने येणार असल्याने हाकेंनी फलाट बदलण्यासाठी पुलाचा वापर न करता शॉर्टकट घेतला.
ते रेल्वे रुळ ओलांडू लागले. कानात हेडफोन घालून हाके रुळ ओलांडत होते.
तितक्यात त्या रुळांवर रेल्वेची टॉवर वॅगन आली. चालकाने अनेकदा हॉर्न वाजवला.
पण हेडफोनमुळे हाकेंना काहीच ऐकू आले नाही. टॉवर वॅगनने त्यांना धडक दिली.
त्यात ते गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस घटनास्थळी धावले.
हाके यांना तातडीने राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झालेला होता.
या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | मेंदूतील रक्तस्त्रावाने पोलीस कोठडीतील आरोपीचा मृत्यु