CBSC Curriculum And Schedule | राज्यातील शाळांच्या सुट्ट्या कमी कराव्या लागण्याची शक्यता; राज्य अभ्यासक्रम आराखड्यात संकेत
मुंबई: CBSC Curriculum And Schedule | राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तयार केलेल्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार वर्षभरातील राष्ट्रीय-राज्य सुट्ट्या, सत्र सुट्टी, अन्य सुट्ट्या विचारात घेतल्यानंतर २३४ दिवस कामकाज अपेक्षित आहे. त्यामुळे शाळांचा एकूण कामकाजाचा वेळ वाढणार असून, हे कामकाज पूर्ण करण्यासाठी सुट्ट्या कमी कराव्या लागण्याची शक्यता आहे. त्याबाबतचे संकेत राज्य अभ्यासक्रम आराखड्यात देण्यात आले आहेत.
राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार दैनंदिन पाच ते साडेसहा तास अध्यापन होणे आवश्यक आहे. त्यात तिसरी ते पाचवीसाठी घड्याळी १ हजार तास, सहावी ते दहावी साठी घड्याळी १२०० तास शैक्षणिक कामकाज होण्याची अपेक्षा आहे.
मात्र, त्याची पूर्तता सर्व शाळांमध्ये होणे कठीण आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार शाळांना आवश्यक कामकाज कालावधी, राष्ट्रीय श्रेयांक आराखड्यानुसार निश्चित केलेली श्रेयांक पातळी पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसा अध्ययन कालावधी उपलब्ध करून देणे आवश्यक असेल.
दैनंदिन कामकाजासाठी वेळ कमी मिळत असल्याने शाळा जास्त दिवस सुरू ठेवून तो कालावधी वर्षभरात भरून काढता येईल. वर्षभरात अभ्यासक्रमाचा कार्यभार प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी वार्षिक वेळापत्रक लागू करणे आवश्यक आहे, असे आराखड्यात नमूद करण्यात आले आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेने तयार केलेल्या अभ्यासक्रम आराखड्याला सुकाणू समितीने मान्यता दिली आहे. त्यात राज्य मंडळाच्या शाळा साठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे (सीबीएसई) वार्षिक वेळापत्रक लागू करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
सीबीएसईशी संलग्न शाळांचे नवीन वर्ष १ एप्रिल रोजी सुरू होऊन ३१ मार्च रोजी परीक्षेचा निकाल जाहीर करून संपते. या शाळांना मे मध्ये उन्हाळी सुट्टी आणि सत्र संपल्यावर किंवा राष्ट्रीय सण- समारंभाच्या अनुषंगाने काही दिवसांच्या दीर्घ सुट्ट्या दिल्या जातात. मे महिन्यातील सुट्टीनंतर शाळा १ जून रोजी पुन्हा अध्यापन कार्य सुरू करतात.
सीबीएसई संलग्न शाळा भारतभर आणि भारताबाहेरही सुरू आहेत. याचा अर्थ उत्तर भारतातील अति थंड किंवा अति उष्ण असे विषम वातावरण असणाऱ्या क्षेत्रांमध्ये, अतिवृष्टीप्रवण क्षेत्रातील सर्व शाळांसाठी वार्षिक वेळापत्रक समान असल्याचे दिसून येते, असे नमूद करण्यात आले आहे.
सीबीएसईच्या शाळांमध्ये खूप दीर्घ सुट्ट्या न देता अध्ययन-अध्यापन प्रक्रिया, उपक्रम शाळेतच सुरू ठेवले जातात. त्यामुळे सीबीएसई संलग्न शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता चांगली असल्याचे दिसून येते, असे तर्क राज्य अभ्यासक्रम आराखड्यात लावण्यात आले आहेत.
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Chinchwad Assembly Election 2024 | चिंचवड विधानसभा निवडणुकीतून अश्विनी जगताप यांची माघार;
शंकर जगताप यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?