Sanjay Raut on Devendra Fadnavis | ‘युती तुटू नये, त्यावेळी फडणवीस ठाम होते, पण…’ संजय राऊत यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात उंचावल्या भुवया
नाशिक : Sanjay Raut on Devendra Fadnavis | कोणत्याही परिस्थितीत त्यावेळी शिवसेना आणि भाजप युती तुटू नये, यासाठी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आग्रही होते, असे म्हणत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गौप्यस्फोट केला आहे.
संजय राऊत यांनी नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना-भाजप विषयी बोलताना राऊत यांनी पुन्हा एकदा फडणवीस यांची बाजू घेतल्याने या वक्तव्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.
संजय राऊत म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे आपल्याबरोबर असतील, तरच या देशात आपण प्रखर हिंदुत्वाचा प्रचार करु शकतो, असे भाजप नेत्यांचे त्यावेळी मत होते. म्हणून ते शिवसेनेच्या जवळ आले. हिंदूहृदयसम्राट हे महान हृदयाचे नेते होते. त्यांनी सांगितले की, मतांची विभागणी नको, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपण एकत्र काम केले पाहिजे. बाबरी प्रकरणानंतर, अयोध्येच्या राम मंदिर आंदोलनानंतर आम्ही संपूर्ण देशात निवडणुका लढणार होतो. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची एक लाट देशात तयार झाली होती.
पुढे ते म्हणाले की, लोकसभेच्या काळात अटलबिहारी वाजपेयी यांचा बाळासाहेबांना फोन आला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, तुम्ही देशभरात निवडणुका लढत आहात. यामुळे भाजप पक्षाचे नुकसान होईल. हिंदुत्ववादी मते विभागतील. याचा फायदा काँग्रेसला होईल. मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही तुमचे उमेदवार मागे घ्या. बाळासाहेब महान हृदयाचे माणूस होते. त्यांनी आम्हाला सांगितले की, राज्याबाहेरचे उमेदवार मागे घ्या. अटलजींचा फोन होता. आपण त्यांचा सन्मान राखला पाहिजे. राष्ट्रीय स्तरावर आम्हीच होतो, पण आम्ही तेव्हा त्याग केला.
2014 मध्ये एक-एक जागेवरुन 72 तास चर्चा सुरू होती. मी होतो त्यात. ओम माथुर भाजपचे प्रभारी होते. आम्ही त्यांचा सगळा खेळ पाहत होतो. पण मी एक नक्की सांगेन फडणवीस हे कोणत्याही परिस्थिती शिवसेना आणि भाजप युती तुटू नये, या मताचे होते. हे मी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगतो. त्यावेळी युतीबाबत त्यांची भूमिका सकारात्मक होती, तरीही भाजपचा वरुन कार्यक्रम आला, त्यानंतर युती तुटली, असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे.
