Lasalgaon Onion Market | लासलगाव बाजार समिती 5 दिवस राहणार बंद; जाणून घ्या

Lasalgaon

नाशिक : Lasalgaon Onion Market | मार्च महिना अखेरमुळे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व शेतमालाचे लिलाव बंद ठेवण्यात येणार आहेत. शुक्रवारी (28 मार्च) ते मंगळवारी (1 एप्रिल) या पाच दिवसांच्या कालावधीत कांदा आणि भुसार मालाचे लिलाव होणार नसल्याची माहिती समोर आली आहे. तसेचस भाजीपाला आणि द्राक्षमणी या नाशवंत शेतमालाचे लिलाव नियमित सुरू राहतील.

लासलगाव असोसिएशनने लासलगाव बाजार समिती प्रशासनास पत्र दिले आहे. त्यानुसार शुक्रवारी व्यापारी बाहेरगावी जाणार असल्याने तसेच, शनिवारी अमावस्या, रविवारी साप्ताहिक सुटी, सोमवारी रमजान ईद त्याचबरोबर मंगळवारी बँक व्यवहार बंद असल्यामुळे एकूण पाच दिवस लासलगाव बाजार समितीत कांदा आणि भुसार मालाचे लिलाव बंद राहणार आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांनी कांदा व भुसारमाल बाजार समितीत विक्रीसाठी आणू नये, असे आवाहन बाजार समितीकडून करण्यात आले.

दरम्यान, बाजार समितीतील कांदा आणि भुसार मालाचे लिलाव 2 एप्रिलपासून नियमित होणार आहेत. एप्रिलपासून कांदा निर्यातमूल्य शुल्क रद्द केले जाणार असल्याने कांद्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कांद्याच्या किमतींबद्दल शेतकऱ्यांना उत्सुकता आहे.