Pune Crime News | स्वत:च्या मावशीच्या घरात चोरी करणार्या चोराच्या अवघ्या तीन तासात मुसक्या आवळल्या; चोरीचा सर्व माल केला हस्तगत

पुणे : Pune Crime News | दरवाजाला कुलूप न लावता पुसते ओढून घेऊन मुलीच्या घरी गेल्या असताना चोरट्याने घरात शिरुन लोखंडी कपाटातील सोन्याचे दागिने व १० हजार रुपये रोख असा १ लाख २२ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला होता. लष्कर पोलिसांनी अवघ्या तीन तासात या चोरट्याच्या मुसक्या आवळल्या. तेव्हा त्याने आपल्या मावशीच्या घरातच चोरी केल्याचे निष्पन्न झाले. (Arrest In Theft Case)
किरण राजेश कुंटे (वय २८, रा. धोबी घाट, कॅम्प) असे या चोरट्याचे नाव आहे. याबाबत सीमाचंदन मकनुर (वय ४०, रा. पी बी क्वॉर्टर, पुना कॉलेजसमोर, धोबी घाट) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी या घराचा दरवाजा ओढून २४ मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजता मुलीच्या घरी गेल्या होत्या. त्या दरम्यान चोरटा घरात शिरला व त्याने लोखंडी कपाटातून सोन्याचे मंगळसुत्र, डोरले, कर्णफुले, आंगठी व १० हजार रुपये असा १ लाख २२ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला होता. फिर्यादी साडेचार वाजता परत आल्यावर त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. लष्कर पोलीस या गुन्ह्याचा शोध घेत असताना परिसरातील लोकांनी या दीड दोन तासाच्या वेळेत त्या परिसरात किरण कुंटे हा दिसून आल्याचे सांगितले. तसेच सीसीटीव्ही फुटेजमध्येही तो परिसरात दिसून आला होता. फिर्यादी यांना याच्याबाबत विचारणा केल्यावर त्यांनीही त्याच्यावर संशय व्यक्त केला. पोलिसांनी किरण कुंटे याला पकडून चौकशी केली. तेव्हा त्याने गुन्हा कबुल केला. किरण कुंटे हा घरी पाणी पिण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याला मावशीचे घराचे दरवाजे उघडे असल्याचे दिसले. त्याने गुपचुप घरात प्रवेश केला. लोखंडी कपाट उघडून त्याच्या ड्रॉव्हरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व १० हजार रुपये चोरले. त्याच्याकडून चोरी केलेले सर्व सोन्याचे दागिने व रोकड हस्तगत केली आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त दीपक निकम, लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघांवकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल घाडगे, पोलीस अंमलदार महेश कदम, सोमनाथ बनसोडे, संदिप उकिरडे, प्रविण गायकवाड, लोकेश कदम, सागर हराळ, अलका ब्राम्हणे यांनी केली आहे.