Baramati Pune Court News | पुणे : फुकट बिर्याणी न दिल्याने खानावळ चालकास मारहाण, न्यायालयाने सुनावली प्रत्येकी 1 लाख रुपये दंडाची शिक्षा

court dhandhuka

पुणे / बारामती : महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये बारामतीतील तीन जणांना अटक तारखेपासून ते मंगळवारपर्यंत कैद, तसेच प्रत्येकी १ लाख रुपये दंडाची शिक्षा महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण न्यायालयाचे न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी ठोठावली. यामध्ये तिघांनीही अगोदरच शिक्षा भोगलेली असल्याने त्यांना आता दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. हा दंड न भरल्यास त्यांना पुन्हा ३ महिने कारागृहात राहावे लागणार आहे.

किशोर उर्फ डाबर संजय ढोरे (वय-३१), अभिजित ऊर्फ छोटा डाबर अनिल ढावरे (वय-२५) व राहुल बाबूराव ढावरे (वय-२९, सर्व रा. एसटी स्थानकासमोर, बारामती) यांना मंगळवार पर्यंत (दि.२५) कैद व प्रत्येकी १ लाख रुपये दंड व दंड न भरल्यास ३ महिने कैद, अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. २२ जानेवारी २०१९ पासून हे तिन्हीही संशयित तुरुंगातच होते.

या तिघांविरोधात बारामती शहर पोलिसात सन २०१८ मध्ये गुन्हा दाखल झाला होता. एका खाणावळीत फुकट बिर्याणी देत नाही, तसेच पैसे न दिल्याच्या कारणावरून त्यांनी एका खानावळ चालकास मारहाण करत त्याच्या खिशातील पैसे चोरुन नेले होते. तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी याबाबत तपास केला.

न्यायालयाचे पैरवी प्रकाश वाघमारे, पैरवी अंमलदार विद्याधर निचीत, बारामती शहर पोलिस निरिक्षक विलास नाळे, जिल्हा न्यायालय पैरवी अधिकारी पोलिस निरिक्षक संतोष घोळवे यांनी न्यायलयीन कामकाज पाहिले.

You may have missed