Maharashtra Mango Rate | फळांचा राजा बाजारात दाखल, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दर काय? जाणून घ्या

जालना : Maharashtra Mango Rate | फळांचा राजा आंबा गुढीपाडव्यापूर्वीच (Gudi Padwa) बाजारात दाखल झाला आहे. जालना बाजार समितीत (Jalna Market Committee) केशर, दशहरी, लालबाग आणि पदान या चार प्रकारच्या आंब्यांची आवक सुरू झाली आहे. सध्या बाजारात आंब्याची आवक मर्यादित आहे आणि त्यामुळे भावही 150 ते 200 रुपये प्रति किलो दरम्यान आहेत. परंतु, येत्या काळात गुढीपाडव्यानंतर आंब्याची आवक लक्षणीय वाढेल आणि भावही कमी होतील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला विविध प्रकारचे आंबे बाजारात येऊ लागले आहेत. महाराष्ट्रात प्रामुख्याने केरळ, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा तसेच कर्नाटक या राज्यांमधून आंब्यांची आवक होत आहे. सध्या आंब्यांची आवक मर्यादित आहे, त्यामुळे भावही वाढत आहेत.
केसर आंबा हा 200 ते 225 रुपये प्रति किलो, तर लालबाग 150 ते 180 रुपये प्रति किलो या दराने विक्री होत आहे. आंध्रप्रदेशमधून केसर आणि बदाम हे दोन प्रकार येत आहेत. तर दशहरी आंबा 130 रुपये प्रति किलो आहे. दशहरी आंबा देखील आंध्र प्रदेशातून येत आहे.
सध्या, दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमधील आंबे बाजारात उपलब्ध आहेत. कोकणातील आंबे बाजारात आले असले तरी, ते मोठ्या प्रमाणात येईपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल. अशातच यंदा कोकणच्या हापूसचे हवामानातील बदलांमुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे हापूसचे दरदेखील तेजीत राहतील, असेही व्यापाऱ्यांनी सांगितले.
एका महिन्यात गुजरातचा प्रसिद्ध केशर आंबा येईल. या आंब्याचा दर्जा चांगला असल्याने महाराष्ट्रात गुजरातमधील केशरला मोठी मागणी आहे. गुढीपाडव्यापासून बरेच लोक आंब्याची चव घेण्यास सुरुवात करतात. त्यामुळे गुढीपाडव्यानंतर आंब्यांची आवकही वाढेल आणि किमतीही कमी होतील, असे व्यापारी अब्दुल मुक्तदीर यांनी सांगितले.