Pune PMC Property Tax Dept | मिळकत कर आकारणीच्या ‘पेंडींग’ फाईल्सच्या प्रवासाला गती ! पुणे महापालिकेची मिळकत कर भरणा केंद्र सार्वजनिक सुट्टयांच्या दिवशीही सुरू राहाणार

pmc (1)

पुणे : Pune PMC Property Tax Dept | महापालिकेने भोगवटा पत्र दिल्यानंतरही तीन ते चार वर्षांपासून कर आकारणी न झालेल्या ‘पेंडींग’ फाईलचा प्रवास मागील चार दिवसांत गतीने होउ लागला आहेे. एवढेच नव्हे तर आकारणी (असेसमेंट) झाल्यानंतर बिले मिळाल्याने संबधित नागरिक आणि काही बांधकाम व्यावसायीकही तातडीने बिलांच्या रकमा भरू लागल्याने पालिकेच्या तिजोरित भर पडू लागली आहे.

आर्थिक वर्ष संपण्यास जेमतेम चारच दिवस राहीले असताना महापालिकेच्या मिळकत कर विभागाने थकबाकी वसुलीसाठी मोहीम हाती घेतली आहे. नाट्यमय घडामोडीनंतर मिळकत कर विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांचा मिळकत कर विभागाचा कार्यभार उपायुक्त प्रतिभा पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. आर्थिक वर्ष संपत असताना अवघे आठवड्याभरापुर्वी पदभार घेतलेल्या पाटील यांनी थकबाकी वसुलीसाठी विशेष प्रयत्न केले आहेत. एकिकडे विशेष पथकांच्या माध्यमातून वसुली सुरू असतानाच असेसमेंटसाठी राहीलेल्या फाईल्सचाही निपटारा सुरू केला आहे. मागील चार दिवसांतच त्यांनी अगदी तीन ते चार वर्षांपासून पेंडींग असलेली पाचशेहून अधिक मिळकतींच्या असेसमेंटच्या प्रकरणांवर स्वाक्षर्‍या केल्या. मिळकत कराचे बिल मिळाल्यानंतर तातडीने भरणा करू शकणार्‍या मिळकतधारक आणि व्यावसायीकांच्या बिलांना प्राधान्य देण्यात येत आहे. विशेष असे की बिले मिळाल्यानंतर भरणा देखिल सुरू झाला आहे, अशी माहिती मिळकत कर विभागातील अधिकार्‍यांनी दिली.

    यासंदर्भात उपायुक्त प्रतिभा पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्या म्हणाल्या आर्थिक वर्ष संपण्यासाठी फक्त चारच दिवस राहीले आहेत. अंदाजपत्रकातील उत्पन्नाचे उद्धीष्ट पूर्ण करण्यासाठी कसोशिने प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून असेसमेंटची प्रकरणे तातडीने स्वाक्षरी करून बिले काढण्यात येत आहेत. ती संबधितांना देउन टॅक्सही वसुल करण्यात येत आहे. ही प्रकरणे का पेडींग राहीली याकडे लक्ष न देता उत्पन्न वाढीवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून २९ ते ३१ मार्च दरम्यान सार्वजनिक सुट्टी असतानाही महापालिकेची नागरी सुविधा केंद्र सुरू ठेवण्यात येणार आहेत. २९ आणि ३० मार्चला सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या वेेळेत तर ३१ मार्चला रात्री रात्री दहा वाजेपर्यंत ही केंद्र सुरू राहातील. थकबाकीदारांनी २ टक्के व्याज टाळण्यासाठी ३१ मार्चपर्यंत कर भरावा. नागरी सुविधा केंद्रांसोबतच नेट बँकींग, युपीआय वरूनही ऑनलाईन बिल भरण्याच्या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

You may have missed