Khed Pune News | दोन हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतल्यास 100 रुपये दंड, ग्रामपंचायतीच्या अजब फतव्याची रंगली चर्चा

Khed Pune

पुणे : Khed Pune News | खेड तालुक्यातील परसुल ग्रामपंचायतीने पाणी टंचाईवर मात करण्यासाठी अजब निर्णय घेतल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. विहीरीतून तिसरा हंडा पाणी उपसाल तर १०० रुपये दंड भरावा लागेल असा अजब निर्णय ग्रामपंचायतीकडून घेण्यात आलेला आहे. ग्रामपंचायतीच्या या निर्णयाची सध्या चांगलीच चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे.

खेड तालुक्यात पावसाळ्यामध्ये जोरदार पाऊस पडतो, मात्र उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई होते. त्यामुळे यावर्षी पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये, म्हणून येथील ग्रामपंचायतीने अजब फतवा काढला आहे. सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या विहिरीवरून दिवसभरात एका कुटुंबाला दोनच हंडे पाणी मिळेल, तिसरा हंडा भरणाऱ्या कुटुंबाकडून १०० रुपयांचा दंड आकारण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर विहिरीतील पाणी जून महिन्यांपर्य पुरले पाहिजे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या गावातील अनेक कुटुंबे उदरनिर्वाहासाठी शहरात गेली आहेत. त्यामुळे गावात वयस्कर महिलांची संख्या जास्त आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी या विहिरीवरुन पाणी आणण्याची वेळ देखील निश्चित करण्यात आली आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंतच विहिरीवरून पाणी आणायचे, असा नियम करण्यात आला आहे. दरम्यान ग्रामपंचायतीच्या या अजब फतव्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.

You may have missed