Pune PMC News | डांबर खरेदीतील कथित भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी करण्यात येईल; महापालिका आयुक्त डॉ. भोसले यांचे आश्वासन

पुणे : Pune PMC News | महापालिकेला डांबर पुरविणार्या ठेकेदाराने अधिकारी आणि कर्मचार्यांच्या संगनमताने महापालिकेची लूट केल्याचा आरोप झाल्यानंतर महपाालिका आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच नव्याने काढलेल्या डांबर खरेदीची प्रक्रिया देखिल थांबविण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती माजी स्थायी समिती अध्यक्ष ऍड. निलेश निकम यांनी दिली.
ऍड. निलेश निकम यांनी महापालिकेला डांबर पुरवठा करणार्या शिवम ग्रीन एनर्जी या ठेकेदार कंपनीने महापालिकेची कोट्यवधींची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. या ठेकेदाराने महापालिकेला डांबर सप्लाय केल्याची बिले दाखवून तेच डांबर पुणे, सोलापूर आणि सातारा जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागासाठीच्या कामांसाठी पाठविले आहे. एकाच मालाची दोन्हीकडे विक्री करून दोन्ही ठिकाणांहून बिले घेतल्याची बिले अगदी टँकर क्रमांक, दिनांक आणि वेळेसह महापालिका आयुक्तांकडे पुरावा म्हणून दिली आहेत. या गैरव्यवहारामध्ये महापालिकेला डांबर मिळाले नसताना त्याचे पैसे अदा केल्याचा आरोप ऍड. निलेश निकम यांनी केला आहे. पुर्वी महापालिका थेट रिफायनरींकडून डांबर खरेदी करत होती. मात्र, मागील तीन वर्षांपासून ठेकेदाराच्या मार्फत डांबर खरेदी केले जात आहे. यामुळे महापालिकेला दहा ते बारा कोटी रुपये अधिक द्यावे लागत आहेत, असा आरोपही निकम यांनी केला आहे.
दरम्यान, महापालिकेने पुन्हा तीन वर्षांसाठी डांबर पुरवठ्याची निविदा काढली असून पुन्हा शिवम ग्रीन एनर्जी या एकाच कंपनीची निविदा आली आहे. ठेकेदाराबद्दल तक्रार केली असतानाही पथ विभागाने ही निविदा उघडली असून फसवणूक करणार्या कंपनीलाच काम देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. महापालिका आयुक्तांनी यामध्ये हस्तक्षेप करून ही खरेदी थांबवावी. मागील खरेदीची चौकशी करून संबधितांवर कायदेशीर कारवाई करावी. महापालिकेचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी थेट कंपन्यांकडून खरेदी करावी, अशी मागणी आयुक्तांकडे केली. आयुक्त डॉ. भोसले यांनी याप्रकरणी समिती स्थापन करून चौकशी करण्यात येईल. तोपर्यंत निविदा प्रक्रियेला स्थगिती देण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे ऍड. निलेश निकम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.