Indapur Pune News | बंधक केलेल्या 22 मजूर आणि 19 बालकांसह 41 जणांची सुटका; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर कारवाई

Jalgaon Crime (3)

इंदापूर : Indapur Pune News | रेडा येथे कामाच्या ठिकाणी बंधक करून ठेवण्यात आलेल्या २२ मजूर आणि १९ बालकांसह ४१ जणांची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी मजुरांच्या नातेवाइकांनी छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यांनी तत्काळ पुण्याचे जिल्हाधिकारी व कामगार कल्याण मंडळाच्या उपायुक्तांना पत्रव्यवहार करीत कार्यवाहीची विनंती केली. त्यावर वरिष्ठ कार्यालयाकडून आलेल्या सूचनांवरून इंदापूरचे तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांनी संबंधित कामगारांना बंधमुक्त करीत पोलिस ठाण्यात हजर केले. त्यावरून मुकादामासह ट्रॅक्टर मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संदीप ताराचंद ठाकरे व इतर (रा. कन्नड, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे २५ मार्चला तक्रारी अर्ज दाखल केला होता. त्यानुसार त्यांच्या परिवारातील व्यक्ती हे ऊसतोडीच्या कामासाठी १६ ऑक्टोबर २०२४ पासून मुकादम रघुनाथ धनाजी सोनवणे व इंदापूर तालुक्यातील ट्रॅक्टर मालक यांच्या सोबत इंदापूर तालुक्यात गेले होते.

आजपर्यंत कामावर ६ महिने होत आले आहेत. परंतु, त्यांना आतापर्यंत केलेल्या कामाचा हिशेब करून कोणत्याही प्रकारचा मोबदला ट्रॅक्टर मालकाकडून देण्यात आलेला नाही. तसेच, सर्व लोकांना अन्नधान्याचा पुरवठा करीत नाही व जनावरांना सुद्धा चाऱ्याची सोय करून देत नसल्याने एका गायीचा मृत्यू झाला आहे.

ट्रॅक्टर मालक मजुरांकडून ८ लाख रुपयांची मागणी करत असून, पैसे न दिल्यास त्यांना जिवे मारण्याची धमकी देत आहेत. यामध्ये २२ मजूर व १९ लहान मुले, असे एकूण ४१ लोक यामध्ये फसले आहेत. या लोकांना ट्रॅक्टर मालक यांच्याकडून सोडवून द्यावे, तसेच, मुकादम रघुनाथ सोनवणे व ट्रॅक्टर मालक यांच्या विरुद्ध योग्य ती कारवाई करावी, असे तक्रारीत म्हटले होते.

दरम्यान बारामतीचे प्रांताधिकारी वैभव नावडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार जीवन बनसोडे, पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी रेडा येथील संबंधित ठिकाणी भेट देत सर्व मजुरांची पोलिस बंदोबस्तात सुटका केली व त्यांना इंदापूर पोलिस ठाणे येथे आणले.

त्यानंतर विष्णू नारायण गायकवाड (वय ३१, व्यवसाय मजुरी, रा. नेवपूर, ता. कन्नड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नजर कैदेत ठेवणे, काठीने मारहाण करणे याबाबत रघुनाथ धनाजी सोनवणे, संजय पांडुरंग देवकर, विकास संजय देवकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You may have missed