Dhananjay Munde | धनंजय मुंडेंनी करुणासोबत अधिकृत लग्न केलेले नाही, वकिलाचा युक्तिवाद; न्यायाधीश म्हणाले – ‘मग मुलं कोणाची?’ कोर्टात नेमकं काय घडलं?

मुंबई : Dhananjay Munde | राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा (मुंडे) यांना दर महिन्याला २ लाखांची पोटगी देण्याच्या वांद्रे सत्र न्यायालयाच्या अंतरिम आदेशाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज (दि.२९) माझगाव सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली.
यावेळी धनंजय मुंडे यांचे करुणा शर्मासोबत झालेले लग्न हे अधिकृत नाही. धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांच्याशी अधिकृत लग्न केलंच नाही, असा युक्तिवाद धनंजय मुंडे यांच्या वकीलांनी केला. यानंतर करुणा शर्मा यांचे धनंजय मुंडे यांच्यासोबत लग्न झाले, ज्याचे तुमच्याकडे पुरावे काय आहेत?, असा सवाल न्यायाधीशांकडून करुणा शर्मा यांच्या वकीलाला विचारण्यात आला.
यावर हे सगळे पुरावे आम्ही सादर करू…आम्हाला वेळ हवा आहे, असे करुणा शर्माच्या वकीलांनी सांगितले. यानंतर पुढील तारखेपर्यंत आपण पुरावे सादर करा, असे न्यायालयाने सांगितले. पुढील सुनावणी ५ एप्रिलला ठेवण्यात आली आहे.
न्यायालयात नेमकं काय घडलं?
धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांच्यासोबत अधिकृत लग्न केलेच नाही, असा युक्तिवाद धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी केला. यावेळी न्यायाधीशांनी वकिलांना उलट प्रश्न केला. ‘मग धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्या दोन मुलाची आई आणि वडील कोण आहेत?, असे न्यायाधीशांनी म्हटले.
यावेळी धनंजय मुंडे यांचे वकील म्हणाले, मुंडे यांनी मुलांना स्वीकारले आहे पण त्यांच्या आईशी लग्न केलेले नाही. यावेळी कोर्टाने म्हटले, मुलं तुमची आहे म्हणता मग करुणा शर्मा त्यांच्या आई कशा नाहीत?
त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी करुणा शर्मा यांच्या इन्कमचा मुद्दा उपस्थित केला. वकील म्हणाले, १५ लाखाच्या जवळपास करुणा शर्मा यांचा वर्षाला इन्कम आहे, त्या इन्कम टॅक्स भरतात. त्या आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत तरी त्यांनी पोटगीसाठी अर्ज केला आहे.
दोन्ही मुलांना धनंजय मुंडे यांनी स्वीकारली आहेत. त्यांना नावे दिली आहेत, करुणा शर्मा यांच्यासोबत काही काळ घालवला याचा अर्थ त्या धनंजय मुंडे यांच्या पत्नी होतं नाहीत. पती-पत्नी सारखे त्यांचे संबंध नव्हते आणि अधिकृत लग्नही झाले नव्हते, असा युक्तिवाद धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी कोर्टात केला.