Vijay Wadettiwar | ‘मी गुढी-बिढी काही उभारत नाही’; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचे विधान

Vijay-Wadettiwar

चंद्रपूर : Vijay Wadettiwar | राज्यात सध्या विविध विषयावरुन वादंग निर्माण झाले आहे. औरंगजेब कबर, स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेले वक्तव्य आदी मुद्द्यावरुन वाद पेटला आहे. अशातच काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केल्याचे समोर आले आहे. ”मी गुढी-बिढी काही उभारत नाही,” असे वक्तव्य वडेट्टीवार यांनी केले आहे.

चंद्रपूर (Chandrapur) जिल्हा ग्रामीण आणि शहर काँग्रेसच्यावतीने चंद्रपूर शहरात राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा आयोजित केली आहे. विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते या कुस्ती कार्यक्रमाचा समारोप आणि बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित केला होता. या वेळी बोलताना वडेट्टीवार यांनी हे वक्तव्य केल्याने राज्यात चर्चा सुरू झाल्या आहेत.

वडेट्टीवार म्हणाले की, मी गुढी-बिढी काही उभारत नाही. छत्रपती संभाजी महाराजांचा खून झाला, त्याचा हा दुसरा दिवस आहे. आम्ही काय आनंदाची गुढी उभारावी, आम्ही या भानगडीत पडत नाही. ज्याला पडायचे त्याला पडू दे. मराठी नववर्ष फक्त महाराष्ट्रातच का, इतर राज्यात का नाही, असे म्हणत मराठी नववर्ष असलेल्या गुढीपाडव्याबाबत वडेट्टीवार यांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मात्र वडेट्टीवार यांनी गुढीपाडव्याच्या (Gudi Padwa) शुभेच्छाही दिल्या आणि दुसरीकडे ते याच सणावर प्रश्न उपस्थित करत असल्याने संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे ते म्हणतात, मी गुढी-बिढी काही उभारत नाही, पण याच वडेट्टीवार यानी समाज माध्यमावरील त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरून याच सणासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

You may have missed