Sangli Crime News | वकिलीचे शिक्षण घेत असलेल्या २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू, अचानक छातीत दुखू लागलं अन्…

सांगली : Sangli Crime News | वकिलीचे शिक्षण घेत असलेल्या २१ वर्षीय तरुणीला अचानक छातीत दुखू लागल्याने शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. आदिती अभिजित पुराणिक (वय -२१, रा. गावभाग) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. उत्तरीय तपासणीनंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी म्हंटले आहे.
अधिक माहितीनुसार, आदितीची आई एसटी महामंडळात कार्यरत आहे. काही वर्षांपूर्वी आदितीच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर आईने जिद्दीने कुटुंबाची जबाबदारी घेतली. दोन्ही मुलींना मोठ्या जिद्दीने शिकवले. आदिती त्यांची मोठी मुलगी. सध्या ती वकिलीचे शिक्षण घेत होती. तिला नृत्याची आवड होती. गुरुवारी सायंकाळी अचानक तिला त्रास जाणवू लागला. शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
तिच्या अचानक जाण्याने मित्रमंडळी, सहकाऱ्यांसह कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. सिव्हिल रुग्णालयात तिच्या माऊलीने फोडलेला हंबरडा आणि बहिणीच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू पाहून उपस्थितांची मनेही हेलावली. कुटुंबीय व मित्र-मैत्रिणींच्या आक्रोशाने रुग्णालय परिसर सुन्न झाला होता.