Pune Crime News | लष्करातील भगोड्या जवानानेच केली घरफोडी ! हवालदाराच्या घरातून चोरुन नेले 13 लाखांचे दागिने, वानवडी पोलिसांनी केले अटक

पुणे : Pune Crime News | लष्कराच्या हवालदाराच्या घरातून २१ तोळे सोन्याचे दागिने चोरुन पळून गेलेल्या भगोड्या जवानाला वानवडी पोलिसांनी सातार्यातून अटक केली. आरोपीकडून तसेच दिल्लीतील सोनारकडे विक्री केलेले १६ तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. (Arrest In Theft Case)
अमरजीत विनोदकुमार शर्मा (वय ३०, रा. बघेल, ता. बदसर, जि. हमिरपूर, हिमाचल प्रदेश) असे या चोरट्याचे नाव आहे. अमरजित शर्मा हा लष्करात जवान होता. सेवा कालावधी पूर्ण न करता तो लष्करातून पसार झाल्याने त्याला भगोडा घोषित करण्यात आले आहे. लष्करात काही काळ असल्याने त्याला लष्करातील सैनिक कोठे राहतात त्यांची राहण्याची पद्धत त्याला माहिती होती. त्याचा गैरफायदा घेऊन त्याने घरफोडी केली होती.
याबाबत वानवडी परिसरात राहणारे लष्करातील जवान के़ एम़ वादीवेल्लू (वय ३५) यांची पत्नी कामानिमित्त बाहेर गेली होती. शर्मा यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील २१ तोळे सोन्याचे दागिने चोरुन नेले होते.
घरफोडीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी परिसरातील वानवडी, लष्कर, गोळीबार मैदान चौक, मंगळवार पेठ, खडकी, बंडगार्डन, विमाननगर, पुणे रेल्वे स्टेशन परिसर असा सुमारे २० किमी परिसरातील १२० सीसीटीव्ही कॅमेर्याचे फुटेज तपासले. डम डाटा तपासल्यानंतर त्यात संशयित चोरटा कैद झाला होता. तो पुणे स्टेशन येथील शेठ मोरारजी गोकुळदास सॅनेटोरियम आणि धर्मशाळा येथे रहायला होता, याची माहिती मिळाली. तेथील लॉजवर त्याने दिलेले आधार कार्ड, मोबाईल नंबर यावरुन तो अमरजीत शर्मा असल्याची माहिती मिळाली. तांत्रिक तपासात तो उत्तर प्रदेश, अंबाला, जोधपूर, हिमाचल प्रदेश, दिल्लीत वास्तव्याला असल्याची माहिती मिळाली. पोलीस अंमलदार अमोल गायकवाड व विष्णु सुतार यांना माहिती मिळाली की, तो बंगळुरुत गेला आहे. त्याबरोबर पोलीस पथक बंगळुरुकडे रवाना झाले. तोपर्यंत तो बंगळुरुहून बेळगावकडे बसमधून रवाना झाल्याची माहिती मिळाली. पोलीस पथक त्याच्या पाठोपाठ येत होते. बेळगाव येथे तपासण्याची केली़ तेव्हा तो बसने सातार्याच्या दिशेने गेल्याचे दिसून आले. पोलिसांनी बेळगावहून त्याचा पाठलाग सुरु केले. सातार्याजवळ त्याला ३० मार्च रोजी पहाटे पोलिसांच्या पथकाने बसमधून शर्माला ताब्यात घेतले. त्याच्याकडील झडतीत २३ हजार ६०० रुपये, ४ मोबाईल, आर्मीचे कपडे, आधार कार्ड व स्टीलची कटावणी असा माल मिळाला. चौकशीत त्याने घरफोडी केल्याची कबुली दिली. चोरी केलेले सोन्याचे दागिने हडपसर येथील सोनाराला विकल्याचे सांगितले. पोलिसांनी करण सत्यप्रकाश डागर (वय २८, रा. बी टी कवडे रोड, घोरपडी) याला अटक करुन त्याच्याकडून सोन्याचे दागिने जप्त केले.
चोरी करुन हिमाचल प्रदेशला गावाकडे जाताना त्याने दिल्ली येथे आर्मीचे कार्ड दाखवून एका सराफाकडे सोने गहाण ठेवून पैसे घेऊन गेला होता. त्यांना ही गोष्ट सांगितल्यावर त्याने गहाण ठेवलेले सोने परत केले. त्याच्याकडून १३ लाख ७७ हजार रुपयांचे एकूण १६२ ग्रॅम दागिने जप्त केले आहे. पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोणे तपास करीत आहेत.
पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक
लष्करी जवानाच्या घरातील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणल्याने लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतूक केले.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजीत आदमाने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गोविंद जाधव, पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोणे, पोलीस अंमलदार दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, अमोल गायकवाड, विष्णु सुतार, गोपाळ मदने, यतीन भोसले, सोमनाथ कांबळे, अभिजित चव्हाण, बालाजी वाघमारे यांनी केली आहे.