Wardha Accident News | दुर्दैवी! रानडुक्कराला वाचविताना भीषण अपघात; पोलीस कर्मचार्यासह पत्नी, दोन चिमुकल्यांचा मृत्यू, वर्धातील हृदय पिळवटून टाकणारी घटना

वर्धा : Wardha Accident News | वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव येथून अपघाताची एक मोठी बातमी समोर आली आहे. एका रानडुक्करामुळे पोलीस कर्मचाऱ्याचे संपूर्ण कुटुंब संपले आहे. हे कुटुंब सोमवारी (७ एप्रिल) मध्यरात्री वर्ध्याच्या तरोडा रस्त्यावरून कारने जात होते. यावेळी अचानक रस्त्यावर एक रानडुक्कर आडवे आले. या डुक्कराला वाचविण्याच्या नादात संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू झाला.
दरम्यान, या अपघातात पोलीस कर्मचाऱ्यासह त्यांची पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. रस्ते अपघातात अशाप्रकारे कुटुंबाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रशांत वैद्य असे मृत पावलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्री प्रशांत वैद्य, पत्नी प्रियंका वैद्य आणि दोन मुलांसह कारने वर्ध्याकडे जात होते. तिरोडा गावाजवळ आल्यानंतर अचानक रस्त्यावर एक रानडुक्कर आडवे आले. भरधाव वेगात असलेल्या कारने या डुक्कराला उडवले. त्यानंतर प्रशांत वैद्य यांचे कारवरील नियंत्रण सुटले. त्याचवेळी समोरून डिझेल टँकर येत होता. कारचा वेग जास्त असल्याने भरधाव वेगाने कार डिझेल टँकरला धडकली.
कार आणि टँकरची समोरासमोर जोरदार टक्कर झाल्याने यामध्ये पोलीस कर्मचारी प्रशांत वैद्य यांच्यासह त्यांची पत्नी आणि तीन वर्षांचा मुलगा, पाच वर्षांच्या मुलीचाही मृत्यू झाला आहे. प्रशांत वैद्य आणि त्यांच्या पाच वर्षांच्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.