CM Devendra Fadnavis | नांदेड अपघातात आई गमावली, मुलाच्या मदतीसाठी धावले मुख्यमंत्री फडणवीस; घेतला हा मोठा निर्णय..

Devendra Fadnavis

नांदेड : CM Devendra Fadnavis | वसमत तालुक्यातील गुंज येथील शेतमजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत पडून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा मुलगा कृष्णा राऊत याच्या शिक्षणाची जबाबदारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. तसेच, मृताच्या कुटुंबीयांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नुकतेच गुंज येथे विशेष सहायता शिबिराचे आयोजन केले होते. या दुर्घटनेची दखल प्रधानमंत्री कार्यालय आणि मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली आहे.

नांदेड जिल्ह्यातील आलेगाव येथे शुक्रवारी ४ एप्रिलला सकाळी ७.३० वाजता ही दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत वसमत तालुक्यातील गुंज येथील नऊ महिला आणि एक पुरुष शेतमजूर आलेगाव शिवारातील शेत गट क्र. २०१ मध्ये शेती कामासाठी जात होते. सदरील शेताजवळ आले असता, पाण्याने भरलेल्या विहिरीत हे शेतमजूर ट्रॅक्टरसह पडल्यामुळे त्यातील सात महिलांचा मृत्यू झाला. दरम्यान, या झालेल्या अपघातातील मृत व्यक्तींच्या कुटुंबांच्या पाठीशी राज्य सरकार उभे राहिले असून, नांदेड आणि हिंगोली येथील जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांमार्फत पुन्हा या घटनाक्रमाचा आढावा घेतला आहे.

दरम्यान, त्यातील एका मृत महिलेचा मुलगा कृष्णा तुकाराम राऊत याचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी समाज माध्यमांवरील व्हिडिओ पाहिला. आणि त्यांनी या व्हिडीओची तत्काळ दखल घेतली. त्या व्हिडिओमधील लहान मुलाची वेदना आणि भावना समजून घेत त्यांनी कृष्णाच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी स्वतः घेत असल्याचे जाहीर केले. त्याचबरोबर मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयाची आर्थिक मदतही जाहीर करण्यात आली आहे.

You may have missed