Pune Crime Court News | कॅबचालकाच्या खुनप्रकरणात एकाला जन्मठेप; अंमली पदार्थाच्या तस्करीसाठी कॅब पळवून नेण्यासाठी केला होता खून

Pune Crime Court News | Accused sentenced to life imprisonment in the murder case of Sarpanch's husband

पुणे : Pune Crime Court News | अंमली पदार्थाच्या तस्करीसाठी प्रवासी म्हणून बसून कॅबचालकाचा खून करुन कार चोरुन नेणार्‍या गुन्हेगारास सत्र न्यायालयाने जन्मठेप व ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

तपिश पुखराज चौधरी (वय २६, रा. गगन उन्नती सोसायटी, ईस्कॉन मंदिराशेजारी, कोंढवा) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. त्याने कॅबचालक सुनिल रघुनाथ शास्त्री (वय ५२, रा. घरकुल प्रॉपर्टीज, पठारे वस्ती, लोहगाव) यांचा २२ जून २०१९ रोजी खून करुन कॅब चोरुन नेली होती. कात्रज कोंढवा रोडला एक मृतदेह सापडला होता. आरोपीची ओळख पटेल, असा कोणताही पुरावा नव्हता. शहरातील सर्व सीसीटीव्हीची तपासणी करीत असताना विमानतळाजवळील एका सीसीटीव्ही फुटेजवरुन मृतदेहाची ओळख पटली. सुनिल शास्त्री हे कॅबचालक असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी ओला कंपनीच्या मदतीने कॅबचे लोकेशन शोधल्यावर ती स्विफ्ट कार गुजरात राजस्थान सीमेवर असल्याचे आढळली. गुजरात पोलिसांना त्याची माहिती व लोकेशन पाठविल्यावर पोलिसांनी अमिरगड चेकपोस्टवर गाडीसह तपिशकुमार चौधरी याला पकडले. अंमली पदार्थाच्या तस्करीसाठी त्याने गाडी चोरली होती. आरोपीने रात्री बारा वाजता वाकड येथून कोंढवा येथे जाण्यासाठी ओला कॅब बुक केली होती. रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास कोंढव्याजवळ गाडी थांबली असता चौधरीने चालक सुनिल शास्त्री याचा दोरीने गळा आवळून खून केला होता. त्यानंतर मृतदेह बाहेर फेकून कार घेऊन तो पसार झाला होता.

या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे यांनी तपास करुन न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर केले होते. सबळ साक्षीपुराव्या अंती सत्र न्यायालयाने आरोपी तपिश चौधरी याला जन्मठेप व ५० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन वर्षे सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.

सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील मिलिंद दातरंगे, प्रदिप गेहलोत कोर्ट पैरवी सहायक पोलीस फौजदार महेश जगताप यांनी काम पाहिले. या कामगिरीकरीता पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे व कोर्ट पैरवी सहायक पोलीस फौजदार महेश जगताप यांना १० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

वारसाला २ लाख रुपये देण्याचे आदेश

न्यायालयाने आरोपीला शिक्षा देताना केलेल्या ५० हजार रुपयांच्या दंडा पैकी २५ हजार रुपये शास्त्री यांच्या कायदेशीर वारसाला द्यावेत, असा आदेश दिला आहे. त्याबरोबरच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने सुनिल शास्त्री यांच्या कायदेशीर वारसाला २ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याबाबत शिफारस करावी, असे सांगितले आहे.

You may have missed