Maval Pune Crime News | रामनवमी निमित्त मल्लखांब प्रात्यक्षिक दाखवताना दुर्घटना, आगीचा प्रयोग करताना तरुण भाजला; दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल (Video)

मावळ : Maval Pune Crime News | रामनवमी निमित्त तळेगाव दाभाडे येथे काढण्यात आलेल्या मिरवणुकीत मल्लखांब खेळत असताना त्यावर आगीसंबंधी प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. हे प्रात्यक्षिक दाखवत असताना एक तरुण भाजला गेला. ही घटना रविवार (दि.६) सायंकाळी मारुती मंदिर चौक, तळेगाव दाभाडे येथे घडली.
याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरज सुरेश थोरात (वय-२५, सोमाटणे, मावळ), शिवम सुधीर कसार (वय-२०, कोथरूड, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस अंमलदार कृष्णा कातकडे यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राम नवमी निमित्त तळेगाव दाभाडे येथे मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये तलवारबाजी आणि आगीसंबंधी प्रात्यक्षिक करण्यास पोलिसांनी बंदी घातली होती. तरीदेखील आयोजक सुरज थोरात याने मल्लखांब करणारा तरुण शिवम कसार याला आगीबाबत प्रात्यक्षिक करण्यास सांगितले. हे प्रात्यक्षिक करत असताना शिवम याच्या चेहऱ्याला भाजले. यामध्ये तो जखमी झाला. याप्रकरणी आयोजक आणि प्रात्यक्षिक सादर करणारा अशा दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.