Ajit Pawar On Manikrao Kokate | पक्षाच्या बैठकीला अर्धा तास उशीरा पोहोचले, कोकाटेंना पाहून अजित पवारांनी सुनावले खडेबोल

Ajit Pawar - Manikrao Kokate

मुंबई : Ajit Pawar On Manikrao Kokate | राज्याचे कृषीमंत्री झाल्यापासून सातत्याने वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असलेल्या माणिकराव कोकाटे यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार रागावल्याची चर्चा आहे. अजित पवार यांच्या मुंबईतील देवगिरी या निवासस्थानी मंगळवारी पक्षाची नियोजित बैठक पार पडली. या वेळी अजित पवार यांनी कोकाटे यांना खडेबोल सुनावल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (Nationalist Congress Party) बैठकीला कृषीमंत्री कोकाटे हे अर्धा तास उशीरा दाखल झाले. तोपर्यंत राष्ट्रवादीचे इतर नेते देवगिरीवर दाखल होऊन बैठक देखील सुरू होती. त्यामुळे अजित पवार यांनी बैठकीला उशीरा आलेल्या कोकाटे यांना चांगलेच फैलावर घेतले. प्रसार माध्यमांसमोर सातत्याने पक्षाला अडचणीत आणणारी विधाने करणे, जनता दरबारला पक्ष कार्यालयात हजर न राहणे आदींबाबत अजित पवार यांनी कोकाटे यांना झापल्याची सूत्रांची माहिती आहे. त्याचबरोबर बेशिस्त वर्तणुकीवरूनही कोकाटे यांना खडेबोल सुनावल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साप्ताहिक आढावा बैठक मंगळवारी मान्यवर लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी राज्यातील विविध प्रश्नांबाबत चर्चा झाली. प्रत्येकाच्या मतदारसंघातील विकासकामांचा आढावा घेतला. निधीअभावी कामे रखडता कामा नये, लोकांची गैरसोय होऊ नये, अशा सूचना केल्या. तसेच, अधिक कार्यक्षम होण्यासाठी सर्वांना प्रोत्साहित केले, असे ट्विट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीनंतर केले होते.

You may have missed