Maval Pune Crime News | बहिणीशी पळून जाऊन लग्न केल्याचा राग, मित्रांशी संगनमत करून भावोजीवर कोयता आणि लोखंडी रॉडने हल्ला, मावळात खळबळ

मावळ : Maval Pune Crime News | बहिणीशी पळून जाऊन लग्न केल्याचा राग मनात धरून तिघांनी एका तरुणावर कोयता आणि लोखंडी रॉडने हल्ला करत त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याने मावळात खळबळ उडाली आहे. संकेत तोडकर असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. शिवराज बंडू जाधव, यश अजय जाधव, आणि विशाल पाथरवट अशी आरोपींची नावे आहे. ही घटना ५ एप्रिलला सांगवी गावच्या हद्दीतील वडगाव- मावळ- सांगवी रस्त्यालगत असलेल्या अनुष्का हॉटेलजवळ घडली. या घटनेत जखमी झालेल्या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अधिक माहितीनुसार, संकेत तोडकर याने शिवराज जाधवच्या बहिणीसोबत पळून जाऊन लग्न केले होते. बहिणीने पळून जाऊन लग्न केल्याचा राग शिवराजच्या मनात होता. त्यामुळे त्याने षडयंत्र रचत भावजीवर हल्ला केला. संकेत तोडकर हे त्यांच्या चुलत भावासोबत स्कूटीवर बसून गावच्या यात्रेच्या वर्गणीचा हिशोब करत होते. त्याचवेळी आरोपी शिवराज जाधवने यश जाधव आणि विशाल पाथरवट यांच्यासोबत संकेत तोडकर याने बाईकच्या सहाय्याने संतोष तोडकर याच्या बाइकला धडक दिली.
शिवराज जाधवने बाइक द्वारे धडक दिल्यामुळे संकेत तोडकर आणि त्याचा चुलत भाऊ खाली पडले. त्यानंतर शिवराज आणि यश यांनी सोबत आणलेल्या कोयत्याने संकेत यांच्यावर उजव्या हाताच्या दंडावर, पोटरीवर, अंगठ्यावर आणि डाव्या खांद्या वार केले. तर विशाल पाथरवटने लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यावर, मानेवर आणि पाठीवर जोरदार मारहाण केली. या हल्ल्यात संकेत तोडकर गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान यश जाधव आणि विशाल पाथरवट यांना वडगाव पोलिसांनी सापळा रचत अटक केली. वडगाव मावळ न्यायालयाने या दोघांना ८ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तर या प्रकरणातील शिवराज जाधव हा आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.