RBI Repo Rate | गृहकर्जावरील EMI कमी होणार, रेपो दरात 0.25 बेसिस पॉइंटची कपात; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा मोठा निर्णय

मुंबई : RBI Repo Rate | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण समितीच्या बुधवारी (९ एप्रिल) झालेल्या बैठकीत रेपो रेटमध्ये कपात केली आहे. रेपो रेटमध्ये ०.२५ बेसिस पॉईंटची कपात केल्याने आता रेपो रेट हा ६ टक्क्यांवर आला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी याबाबतची घोषणा केली.
फेब्रुवारी महिन्यात महागाई दर ३.६१ टक्क्यांवर घसरला आहे. तर हाच दर जानेवारी महिन्यात ४.२६ टक्के इतका होता. त्यामुळे रेपो रेटमध्ये कपात होईल, अशी अपेक्षा होती. ही अपेक्षा पूर्ण झाली आहे, ज्यामुळे सामान्य गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर, या निर्णयामुळे आगामी काळात बँकांकडून गृह कर्ज (Home loan), वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज आणि इतर कर्जांच्या व्याजदरात कपात केली जाण्याची दाट शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेने सलग दुसऱ्यांदा रेपो रेट कमी केल्याने बँकाकडून कर्जांवरील व्याजदरात कपात करण्यासाठीचा दबाव वाढू शकतो. याचा फायदा गृहकर्ज आणि वाहन कर्जाचे हप्ते फेडणाऱ्या सामान्यांना होऊ शकतो.
आरबीआयच्या नियमानुसार, १ ऑक्टोबर २०१९ नंतर ज्यांनी फ्लोटिंग व्याजदरावर कर्ज घेतले आहे. त्यांना बाहेरच्या बेंचमार्कशी जोडणे गरजेचे आहे. त्यामुळे आरबीआयने रेपो रेट घटवल्यास बँकांनाही गृह कर्जावरील व्याज घटवावे लागू शकते. जर आरबीआयने रेपो रेटमध्ये कपात केली, तर गृहकर्जदेखील स्वस्त होऊ शकते. याचा फायदा नवे गृहकर्ज घेणाऱ्यांना आणि फ्लोटिंग इंटरेस्ट रेट असणाऱ्यांना फायदा होईल. जानेवारी ते एप्रिल दरम्यान अनेक सरकारी आणि खासगी बँकांनी त्यांच्या गृहकर्जात ५-२५ बेसिस पॉईंटची कपात केली आहे.