Deenanath Mangeshkar Hospital Case | दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर पोलिसांकडून प्रतिबंधात्मक आदेश जारी, दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई

Deenanath Mangeshkar Hospital

पुणे : Deenanath Mangeshkar Hospital Case | दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तनिषा भिसे (वय-२७) या सात महिन्यांच्या गर्भवती महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेचा राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वार व आवारात विविध पक्षाचे, संघटनांचे कार्यकर्ते यांच्याकडून मोर्चे, आंदोलने, निदर्शने करताना दिसत आहेत. त्याचा रुग्णालयामधील रुग्ण व नातेवाईक यांना त्रास होत आहे.

आंदोलनामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होऊन रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेला व रुग्णांच्या नातेवाईकांना जाण्या-येण्याकरिता अडचण निर्माण होत आहे. मोर्चा, आंदोलने, निदर्शने यामुळे सार्वजनिक शांततेचा भंग करुन रुग्णालयाचे वातावरण बाधित करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या कार्यात व्यत्यय निर्माण होत आहे. दरम्यान पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी प्रतिबंधात्मक आदेश काढले आहेत.

प्रतिबंधात्मक आदेशामध्ये नेमकं काय म्हंटलं आहे?

  • दीनानाथ मंगेशकर रुग्णालय पुणे, हा परिसर व त्याचे सभोवतालच्या १०० मीटर परिसरात रुग्णांच्या नातेवाईकाशिवाय इतर इसमांना एकत्र जमण्यास किंवा रुग्णालयात प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.
  • दीनानाथ मंगेशकर रुग्णालय पुणे, परिसरात दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात येत आहे. सदरचा आदेश संबंधीत रुग्ण, रुग्णवाहिका चालक, रुग्णालयातील कर्मचारी पोलीस अधिकारी व कर्मचारी/सुरक्षा अधिकारी यांना लागु होणार नाहीत.
  • सदर रुग्णालय परिसरात ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास मनाई करण्यात येत आहे.
  • सदर रुग्णालय परिसरात कोणताही आक्षेपार्ह, वाद निर्माण होईल असा मजकूर लिहिण्यास, अगर छापील मजकूर चिकटविण्यास मनाई करण्यात येत आहे. सदरचा आदेश दि. ०९/०४/२०२५ रोजी पासून ते दिनांक १९/०४/२०२५ रोजीपर्यंत अंमलात राहील. सदरच्या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय न्याय संहिता कलम २२३ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील.

You may have missed