Santosh Deshmukh Case | संतोष देशमुखांना मारण्यासाठी 4 जीवघेण्या हत्यारांचा वापर, अंगावर 150 जखमा; धक्कादायक रिपोर्ट समोर

बीड : Santosh Deshmukh Case | केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी दररोज नवी माहिती पुढे येत आहे. देशमुख यांना कसे मारले, याबाबतचे फोटो, व्हिडिओ नुकतेच व्हायरल झाले होते. त्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले. आता संतोष देशमुखांना मारहाण करण्यासाठी वापरलेल्या हत्यारांबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे.
‘वेपन एक्झामिनेशन रिपोर्ट’नुसार, ९ डिसेंबर २०२४ रोजी सरपंच देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या केली होती. यावेळी मारेकऱ्यांनी चार वेगवेगळ्या हत्यारांनी देशमुख यांना मारहाण केली. चारीही विशेष हत्यारही कराड गॅंगने तयार केल्याचा अहवालात उल्लेख करण्यात आलेला आहे. यात गॅस पाईप, गाडीच्या क्लच वायरचा वापर करून बनवलेला धातूचा चाबूक, लाकडी बांबूची काठी आणि लोखंडी पाईप अशा हत्यारांचा समावेश आहे.
दरम्यान, संतोष देशमुख यांच्या शरीरावरती एकूण १५० जखमा आढळल्या होत्या. आरोपींनी याआधीही इतर व्यक्तींना याच हत्यारांनी मारहाण केली, असेही उघड झाले आहे. या हत्यारांनी जर मारहाण झाली, तर मृत्यू होऊ शकतो, असेही या अहवालामध्ये नमूद करण्यात आले. या सर्व प्रकरणांमध्ये हा अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे. या सर्व बाबींचा अहवाल आता न्यायालयात सादर करण्यात आला आहे.