Pune Crime News | शेअर मार्केट व सोन्याच्या व्यवसायामधील आर्थिक नुकसानीतून सराफानेच स्वत:च्या दुकानात घालायला सांगितला दरोडा

crime-logo

धायरीतील श्री ज्वेलर्सवरील दरोड्याचा बनाव उघड

पुणे : Pune Crime News | धायरी येथील श्री ज्वेलर्स या दुकानावर भर दुपारी तिघा चोरट्यानी खेळण्यातील पिस्तुलाचा धाक दाखवून २२ तोळे सोने लुटून नेण्याच्या प्रकाराने पुणे हदरुन गेले होते. पोलिसांनी हा दरोडा टाकणार्‍या तिघांना पकडले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत शेअर मार्केट व सोन्याच्या व्यवसायामध्ये आर्थिक नुकसान झाल्याने सराफानेच हा बनाव रचल्याचे उघडकीस आले आहे.

दिलीप सुभाष मंडलिक (वय ३२, रा. परांडेनगर, दिघी), राजेश ऊर्फ राजु चांगदेव गालफाडे (वय ४०, रा. लांडेवाडी झोपडपट्टी, भोसरी) आणि शाम शेषेराव शिंदे (वय ३७, रा. लांडेवाडी झोपडपट्टी, भोसरी) अशी दरोडा टाकणार्‍यांची नावे आहेत.

वडगाव धायरी येथील श्री ज्वेलर्स यांच्या दुकानात विष्णु सखाराम दहिवाळ यांना मारहाण करुन नकली पिस्तुलाचा धाक दाखवून २० लाख रुपयांचे २२ तोळे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याचा प्रकार १५ एप्रिल रोजी दुपारी घडला होता. नांदेडसिटी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. भरदिवसा घडलेल्या या दरोड्याच्या घटनेचा समांतर तपास गुन्हे शाखा करीत होती. दरोडा व वाहन चोरी प्रतिबंधक पथकाने दुकानापासून धायरी ते दिघीपर्यंत रोडवरील अनेक सीसीटीव्हीची पाहणी करुन आरोपींचा माग काढला. राजेश गालफाडे व शाम शिंदे यांना भोसरीतून पकडण्यात आले. त्यांच्याकडे केलेल्या तपासात त्यांना सांगण्यात आल्यावरुन त्यांनी हा दरोडा टाकल्याचे सांगितले. त्यानंतर दहिवाल यांचा नातेवाईक असलेल्या दिलीप मंडलिक याला पकडण्यात आले. त्याला विश्वासात घेऊन चौकशी केल्यावर त्यांनी दुकानदार विष्णु दहिवाळ यानेच आपल्याला प्रथम १० हजार रुपये व काम झाल्यावर २ लाख रुपये देण्याचे कबुल केल्याचे सांगितले. विष्णु दहिवाल यांनीही पोलीस ठाण्यात येऊन आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

विष्णु दहिवाल यांनी सांगितले की, शेअर मार्केटमध्ये गुंतविलेले पैसे हारलो आहे. मला सोन्याचे व्यवसायात देखील मोठा तोटा झाला आहे. त्यामुळे मी खूप कर्जबाजारी आहे. इतर व्यापारी हे देखील मला त्यांच्याकडून घेतलेल्या पैशांची मागणी करत असल्याने माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मी माझा नातेवाईक दिलीप मंडलिक याला माझ्या दुकानात तुझ्या साथीदारासह चोरी कर. त्यावेळी मी दुकानाचे काऊंटर व डिस्पलेमध्ये नकली दागिने आहेत. माझ्या दुकानामध्ये सोने नाही ते नकली दागिने तू तुझ्या साथीदारासह मला व कामगाराला धमकी देऊन मारहाण करुन घेऊन जा. त्याबदल्यात मी तुला प्रथम १० हजार रुपये देतो़. काम झाल्यानंतर २ लाख रुपये देतो, असे सांगून गुन्ह्याची कबुली दिली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिपान पवार, सहायक पोलीस निरीक्षक छबु बेरड, राहुल यादव, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बुनगे, सहायक पोलीस फौजदार सुनिल चिखले, पोलीस अंमलदार प्रशांत काकडे, नवनाथ वणवे, शिवा क्षीरसागर, स्वप्नील मगर, किशोर शिंदे, पुरुषोत्तम गुन्ला, योगेश झेंडे, मोहन मिसाळ, निलेश कुलथे, भिमराज गांगुर्डे, उत्तम शिंदे, विजय विरणक, प्रथमेश गुरव, अक्षय जाधव, रोशन मंडले यांनी केली आहे.

You may have missed