Bapu Pathare MLA | आमदार बापूसाहेब पठारे यांची येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयाला भेट

येरवडा (पुणे) : Bapu Pathare MLA | येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात अस्वच्छता, सुविधांचा अभाव, अंघोळीसाठी रुग्णांना दिले जाणारे थंड पाणी, निकृष्ट दर्जाचे जेवण या सोबतच कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार अशा धक्कादायक बाबी नुकत्याच उघडकीस आल्या. याच पार्श्वभूमीवर, वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी मनोरुग्णालयाला भेट दिली.
भेटीदरम्यान, पठारे यांनी डॉक्टर तसेच इतर कर्मचारी वर्गाशी संवाद साधत एकूणच व्यवस्थेसंदर्भात, पुरवल्या जाणाऱ्या सुविधा तसेच रुग्णांबाबत विचारपूस करत माहिती जाणून घेतली. सर्वच धक्कादायक गोष्टींच्या संदर्भाने डॉक्टर व कर्मचारी वर्गाला सुधारणेबाबत आवश्यक सूचनाही केल्याचे समजते. रुग्णालयात कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसल्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या प्रमाणात होणाऱ्या त्रासाबाबतही वरिष्ठ अधिकाऱ्यांना पठारे यांनी सुनावले आहे.
“मनोरुग्णालयासारख्या संस्थांमध्ये रुग्णांना स्वच्छता, पोषणयुक्त आहार, योग्य औषधोपचार व मानसिक आधार मिळणे फार गरजेचे आहे. काही समस्या तसेच सुविधांमधील कमतरता लक्षात आल्या असून त्या भरून काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. आवश्यक त्याय सुधारणा घडून याव्यात यासाठी मी लक्ष ठेवून राहणार आहे,” असे आमदार बापूसाहेब पठारे यांनी यावेळी सांगितले.