Kolhapur Crime News | अनैतिक संबंधातून भावजयीने प्रियकराच्या मदतीने काढला दिराचा काटा, हॉटेलवर दारू पाजली मग गळा आवळून खून

कोल्हापूर: Kolhapur Crime News | अनैतिक संबंधातून भावजयीने प्रियकराच्या मदतीने दीराचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. आप्पासो शंकर बोरगावे (वय-४५, रा. मोळे, ता- कागवाड, जि- बेळगाव) असे हत्या झालेल्या दिराचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी गौडप्पा आनंद शिंदे (वय-३३, रा- कात्राळ, ता- कागवाड) आणि राजू भिमाप्पा हुलागटी (रा-देसाईवाडी, ता- अथणी, जि- बेळगाव) या दोघांना ताब्यात घेतले आहे. (Murder Case)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योतिबा डोंगरावर शनिवारी अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. याबाबत कोडोली पोलीस ठाण्यात याबाबत नोंद करण्यात आली होती. मृत व्यक्तीजवळ कोणताही ठोस पुरावा नसल्याने हत्येचा गुन्हा उघडकीस आणणे पोलिसांसमोर आव्हान होते. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी तीन पथके करत जिल्ह्यातील १२० ते १३० सीसीटीव्ही फुटेज तपासले. गुन्ह्यातील चारचाकी गाडी जोतिबा डोंगरावर आल्याचे निष्पन्न झाले. गाडीचा सीसीटीव्हीद्वारे शोध घेत असताना, पथकास जयसिंगपूर येथे या गाडीचा नंबर दिसून आला. ही गाडी अथणी येथील राजू हुलागटी याची असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन सखोल माहिती घेतली असता त्याने खुनाची कबुली दिली. मृत आप्पासो बोरगावे याच्या भावाचे ८ वर्षांपूर्वी निधन झाले होते. भावाच्या मृत्यूनंतर भावाच्या पत्नीशी आप्पासो याचे अनैतिक संबंध होते. काही दिवसांपूर्वी मुख्य आरोपी गौडप्पा शिंदे व आप्पा याच्या भावजचे प्रेमसंबंध निर्माण झाले होते. भावजचे इतर पुरुषाशी प्रेमसंबध झाल्याच्या कारणावरून आप्पासो हा भावजयला मारहाण करून शिवीगाळ करीत होता. याचा राग मनात धरून भावजयने गौडप्पा शिंदे यास फोन करून आप्पा यास संपवण्यास सांगितले.
आरोपी गौडाप्पा शिंदे याने गाडी मालक याच्याशी संगनमत करून १८ एप्रिल रोजी उगार कर्नाटक येथील हॉटेलवर आप्पा यास दारू पाजली. त्यानंतर आप्पास चारचाकी गाडीतून दि. १९ एप्रिल रोजी पहाटे दोन वाजताच्या सुमारास जोतिबा ते गिरोली रोडवरील यमाई मंदिराच्या पायथ्याजवळील डोंगरावर हात-पाय बांधून आणले. तसेच, त्याठिकाणी त्याचा गळा आवळून खून केल्याची माहिती पोलिसांना दिली आहे.