PMC Shahari Garib Yojana | शहरी गरीब योजनेत डायलेसीसचा खर्च पन्नास टक्क्यांनी वाढवला ! सजग नागरीक मंचचा महापालिका प्रशासनावर आरोप

PMC

सर्वच रुग्णालयात संपुर्ण डायलेसीस प्रक्रियेचा एकच दर असावा यासाठी प्रयत्न – आरोग्य विभागाचा दावा

पुणे : PMC Shahari Garib Yojana | महापालिकेच्या शहरी गरीब आरोग्य योजेनेअंतर्गत शहरातील विविध हॉस्पीटलमध्ये रुग्णांवर होणार्‍या डायलेसीसचे दर पन्नास टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय महापालिकेचे तसेच रुग्णांचेही नुकसान करणारा आहे. महापालिका प्रशासनाने याबाबत फेरविचार करावा आणि अगोदरच्या समितीने निश्‍चित केलेल्या दरातच डायलेसिस करावेत अशी मागणी सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली आहे.

  महापालिकेच्या रुग्णालयात चारशे रुपयांत डायलेसीस केले जाते. परंतू महापालिकेच्या शहरी गरीब योजनेअंतर्गत उपचार करणार्‍या खाजगी रुग्णालयांमध्ये डायलेसीसचे दर हे एक हजार ३५० रुपयांपासून दोन हजार ९०० रुपयांपर्यंत असे वेगवेगळे आहेत. महापालिकेच्या पॅनेलवर ३७ खाजगी रुग्णालये आहेत. रुग्णालयांनी आकारणी केल्याप्रमाणे महापालिका त्यांचे बिल देते. डायलेसीस कराव्या लागणार्‍या रुग्णांना उपचारासाठी महापालिका दोन लाखांपर्यंत आर्थीक मदत करते.  

डायलेसीसच्या दरात सुसूत्रता आणि दरनिश्‍चितीसाठी प्रशासनाने मागील मागीलवर्षी तज्ञ डॉक्टरांची समिती स्थापन केली होती. या समितीने महापालिकेच्या संयुक्त प्रकल्प व पॅनेलवरील हॉस्पीटलसाठी जास्तीत जास्त एक हजार ३५० दराची शिफारस केली होती. या शिवाय गरजेनुसार वापरावे लागणारे इंजेक्शनची सुद्धा दरनिश्‍चिती केली होती. परंतू प्रशासनाने याला मान्यता दिली नाही. यानंर आठ महिन्यांनी याचसाठी आरोग्य विभागाने पुन्हा दोन सदस्यीय समिती स्थापन केली. या समितीने अगोदरच्या समितीच्या शिफारशींकडे दुर्लक्ष करत खाजगी हॉस्पीटलमधील डायलेसिसचे दर पन्नास टक्क्यांनी वाढवण्याची शिफारस केली. त्यामुळे सर्व हॉस्पीटलमध्ये एक हजार ९५० रुपये आकारणी केली जाणार. काही खाजगी हॉस्पीटलच्या सोयीसाठीच हे दर जाणूनबुजून वाढवलेत, अशी शंका येते, असे विवेक वेलणकर यांनी म्हंटले आहे.

पॅनेलवरील वेगवेगळ्या हॉस्पीटलमध्ये डायलेसिसचे दर वेगवेगळे आहेत. काही ठिकाणी प्रत्यक्षात डायलेसीसचा दर कमी आकारला जात असला तरी रुग्णाला ट्युबिंग, कन्झुमेबलसह इंजेक्शन्स बाहेरून आणायला सांगितली जातात. त्यामुळे अप्रत्यक्षपणे तो खर्च रुग्णाला उचलावा लागतो. यामध्ये सुसूत्रता यावी आणि औषधे व उपकरणांसहचा डायलेसीसचा खर्च सर्वच हॉस्पीटलमध्ये एकसारखा राहावा यासाठी ससून रुग्णालयाचे डॉक्टर आणि खाजगी डॉक्टरचा समावेश असलेली समिती स्थापन करून डायलेसीसचा एक हजार ९५० रुपये दर निश्‍चित करण्यात आला आहे.

  • डॉ. संजीव वावरे, सहाय्यक आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका.

You may have missed