Maharashtra Weather Update | पश्चिम महाराष्ट्रात कुठे ऊन कुठे पाऊस! पुढील 24 तासांसाठी हवामान कसे असेल, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Maharashtra Weather Update | राज्यात प्रचंड उष्णता जाणवत आहे. मंगळवारी चंद्रपूरमध्ये देशातील सर्वाधिक ४५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बुधवारी (२३ एप्रिल) विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातही पारा जास्त राहील. पुढील २४ तासांसाठी हवामान आणि तापमानाचा अंदाज जाणून घेऊया.
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रावर सध्या दुहेरी संकट कोसळत आहे. एकीकडे तापमान वाढत असताना, अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची योग्य काळजी घ्यावी लागेल. दुसरीकडे, नागरिकांना त्यांच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी लागेल.
गेल्या २४ तासांत पश्चिम महाराष्ट्रात सरासरी तापमान २१.० ते ४३.० अंश सेल्सिअस दरम्यान होते. सोलापूर जिल्हा सर्वात उष्ण आहे, मंगळवारी सोलापूरमध्ये ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील २४ तासांत कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २६ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. उष्ण आणि दमट हवामानासाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
पुणे जिल्ह्यात उष्णतेची लाट वाढली आहे. गेल्या २४ तासांत पुण्यात कमाल तापमान ३९.९ आणि किमान तापमान २२.० अंश होते. पुढील २४ तासांत पुण्यात उष्णता कायम राहणार असून, पारा ४० अंशांवर राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुणे जिल्ह्यात आकाश निरभ्र राहील.
मंगळवारी ढगाळ हवामानामुळे कोल्हापूर जिल्ह्यात तापमानात अंशतः घट झाली. कमाल तापमान ३५.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. रात्री काही ठिकाणी जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडला. पुढील २४ तासांत कोल्हापूरमधील तापमान ३८ अंश सेल्सिअसवर राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी जोरदार वाऱ्यांसह विखुरलेला पाऊस पडण्याची शक्यता आहे.
सातारा जिल्ह्यात खूप जास्त असलेला पारा अंशतः कमी झाला आहे. गेल्या २४ तासांत सातारा जिल्ह्यात ३९.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बुधवारी साताऱ्यात कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील.
सांगली जिल्ह्यात पुढील २४ तासांत किमान तापमान ४० अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. गेल्या २४ तासांत सांगली जिल्ह्यात ३७.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तसेच, जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारपीट झाली.