Solapur Crime News | दुर्दैवी! पाण्याची टाकी साफ करताना विषारी वायूमुळे श्वास गुदमरला; दोन कामगारांचा मृत्यू

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – Solapur Crime News | येथील अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरात पोमानी ॲप्रेल्स कारखान्यामध्ये पाण्याची टाकी साफ करण्यासाठी गेलेल्या दोन कामगारांचा टाकीतील रासायनिक विषारी वायूमुळे श्वास गुदमरून मृत्यू झाला आहे. इतर एक कामगार बचावला आहे. शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडल्याचे समोर आले आहे.
सागर नारायण कांबळे (वय २०, रा. स्वागतनगर, सोलापूर) व सिद्धाराम यशवंत चिलगेरी (वय २८, रा. जुळे सोलापूर) अशी या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कामगारांची नावे आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, पोमानी ॲप्रेल्स कारखान्यात निर्यातक्षम टॉवेलची निर्मिती होते. या कारखान्यात पाण्याची टाकी साफ करण्यासाठी तीन कामगार गेले होते. परंतु, टाकीत पसरलेल्या रासायनिक विषारी वायुमुळे दोन कामगारांचा श्वास गुदमरला आणि ते टाकीत पडले. दरम्यान, या घटनेची माहिती समजताच महापालिकेच्या अग्निशमन यंत्रणेने धाव घेत बचाव कार्य सुरू केले. या घटनेचा तपास एमआयडीसी पोलिसांनी सुरू केला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर दोन्ही मृतांच्या नातेवाईकांनी संतप्त होऊन कारखाना मालकाची मोटार फोडली आहे. त्यामुळे एमआयडीसी भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.