Maharashtra Weather Update | पाऊस धुमाकूळ घालणार, पुढील 24 तास ‘या’ जिल्ह्यांसाठी हवामान खात्याचा ‘हायअलर्ट’

rains

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Maharashtra Weather Update | जुलैच्या सुरुवातीला समाधानकारक पाऊस न पडणाऱ्या मुंबईत अखेर रविवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडला. गेल्या काही दिवसांपासून उन्हाळ्याच्या झळा सोसणाऱ्या मुंबईकरांनी पावसाचे आनंदाने स्वागत केले. रविवार आणि सोमवारी शहराच्या उपनगरात पावसाचा जोर अधिक होता. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत कोकणासह मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मुंबईसह कोकणातही पावसाची परिस्थिती सुधारली आहे. अलिबागमध्ये ९० मिमी, मुरुडमध्ये ७७ मिमी आणि श्रीवर्धनमध्ये ६५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुढील चार ते पाच दिवसांत दक्षिण कोकणात पावसाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंगळवार ते शुक्रवारपर्यंत रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्या प्रमुख शुभांगी भुते म्हणाल्या की, मान्सूनचे वारे पुन्हा सक्रिय झाले आहेत आणि हवामान आता पावसासाठी अनुकूल बनले आहे. सध्या वातावरणातील आर्द्रता वाढली आहे. वाऱ्यांचा वेग वाढण्याची शक्यता आहे. दक्षिण ओडिशाच्या वरच्या वातावरणावर चक्राकार परिभ्रमण तयार झाले आहे. तसेच, उत्तर कर्नाटक आणि दक्षिण आंध्र प्रदेश दरम्यान पूर्व-पश्चिम ट्रफ रेषा तयार झाली आहे. याशिवाय, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे २७ जुलैपर्यंत राज्यात पाऊस वाढेल.

बुधवार आणि गुरुवारी मुंबई आणि ठाण्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. गुरुवारी ठाणे जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे, तर बुधवार आणि गुरुवारी पालघर जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. दरम्यान, मुंबई आणि कोकण परिसरात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून, पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे.

You may have missed