Pune Crime News | पुणे: बाजीराव रोडवर दिवसाढवळ्या 17 वर्षीय तरुणाचा कोयत्याने सपासप वार करून खून
पुणे : Pune Crime News | शहरात गुन्हेगारी प्रकारांची मालिका थांबत नसून भरदिवसा हल्ले आणि हत्यांच्या घटनांत वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर, शहराच्या मध्यवर्ती बाजीराव रोड परिसरात 17 वर्षीय मयांक सोमदत्त खरारे (रा. साने गुरुजी नगर, पीएमसी कॉलनी, एसपी कॉलेजमागे) याचा दुपारी उघड्यावर खून झाला. गेल्या तीन दिवसांतील हा दुसरा खून असल्याने शहरात खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
अलीकडेच आंदेकर खूनप्रकरण आणि त्याआधी गणेश काळे हत्या प्रकरणामुळे शहर दणाणलेले असतानाच ही नवी घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, आज दुपारी सुमारे 3.15 वाजता, मयांक हा मित्र अभिजीत इंगळेसोबत दुचाकीवरून जात असताना महाराणा प्रताप उद्यानाजवळ, दखनी मिसळ समोर तिघांनी त्याला थांबवले. तोंडावर मास्क घातलेल्या या तिघांनी धारदार शस्त्रांनी मयांकच्या डोक्यात व चेहऱ्यावर वार केले. गंभीर जखमेमुळे मयांकचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
पोलिसांनी परिसर बंदोबस्तात घेऊन चौकशी सुरू केली आहे. हल्लेखोरांचा शोध वेगाने सुरू असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास केला जात आहे.
