Pune Crime News | MPDA ची कारवाई केल्यानंतर 4 वर्षे फरार असलेल्या गज्या मारणेचा राईट हँड सुनिल बनसोडे याला अटक
पुणे : Pune Crime News | गज्या मारणे याची तळोजा कारागृहातून सुटका झाल्यावर मुंबई पुणे रोडवर रॅली काढण्यात आली होती. रॅलीत सहभागी झालेल्या गजा मारणेच्या गुंडांवर पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे ग्रामीण पोलीसांनी विविध गुन्हे दाखल केले होते. त्यावेळी गज्या मारणेचा राईटहँड सुनिल नामदेव बनसोडे हा फरार झाला होता. कोथरुड पोलिसांनी त्याला काल वारजे येथून अटक केली.
तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर १५ फेब्रुवारी २०२१ रोजी गजा मारणे याने रॅली काढली होती. त्यात गजा मारणेसह त्याच्या साथीदारांवर तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर गजा मारणे याने वडगाव मावळ न्यायालयात हजर राहून जामीन मिळविला होता. याच गुन्ह्यात रुपेश मारणे, सुनिल बनसोडे व इतरांनी अटक पूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला होता. त्यानंतर गजा मारणे याच्यासह त्याच्या साथीदारांना पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केली होती. रॅलीमध्ये वापरलेल्या महागड्या गाड्या जप्त केल्या होत्या. यावेळी सुनिल नामदेव बनसोडे हा फरार झाला, तो अद्याप पोलिसांना सापडला नव्हता. सुनिल बनसोडे हा वारजे येथे असल्याची माहिती कोथरुड पोलिसांना मिळाली. त्यावरुन पोलिसांनी त्याला मंगळवारी अटक केली.
याबाबत पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले की, गजानन मारणे याचा राईट हँड सुनिल बनसोडे याच्यावर यापूर्वी ८ ते १० गुन्हे दाखल असल्याने तत्कालीन पोलीस आयुक्तांनी त्यांच्यावर एम पीडीए अन्वये स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला होता. परंतु, तो अद्याप सापडत नव्हता़ कोथरुड पोलिसांना तो वारजे येथे असल्याची माहिती मिळाल्यावर त्यांनी त्याला अटक केली आहे.
सदरची कारवाई ही पोलीस उप-आयुक्त संभाजी कदम, सहा. पोलीस आयुक्त भाऊसाहेब पटारे यांचे सुचनेनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईगडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रकाश धेंडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश बडाख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक संजय नरळे, पोलीस अंमलदार गणेश शिंदे, अमित जाधव, योगेश वाघ, बालाजी काटे, निखील तांगडे, सागर कुंभार, शरद पोळ, सत्यजित लोंढे, अमित शेलार, अमोल सुतकर, वारजे माळवाडी पोलीस ठाणे, पुणे शहर यांनी केलेली आहे.
