Pune Crime News | राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या पदाधिकार्याच्या कार्यालयात शिरुन मारहाण करण्याचा प्रयत्न, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, महर्षीनगरमधील घटना
पुणे : Pune Crime News | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाच्या पदाधिकार्याच्या कार्यालयात शिरुन बांबुने मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत दिनेश पंडित खराडे (वय ४७, रा. संत ज्ञानदेव शाळेजवळ, महर्षीनगर) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी तिघा तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार महर्षीनगर येथील त्यांच्या कार्यालयात ५ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश खराडे हे सिव्हिल इंजिनिअर असून बांधकाम व्यावसायिक आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट या पक्षाचा माहिती अधिकार सेलचे पुणे शहर अध्यक्ष आहेत. महर्षीनगर येथील संत ज्ञानदेव शाळेजवळ यांचे कार्यालय आहे. ५ नोव्हेंबर रोजी ते कार्यालयात असताना रात्री १० वाजण्याच्या सुमारास एक तरुण त्यांच्या कार्यालयात आला. त्याच्या हातामध्ये लाकडी बांबु होता. त्याने या बांबुने त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी तो बांबु हाताने पकडला. तेव्हा हा तरुण तेथून बाहेर पळून गेला. ते त्याच्या पाठोपाठ कार्यालयाच्या बाहेर गेले. तेव्हा बाहेर एका दुचाकीवर अगोदरच दोघे जण थांबले होते. त्यांच्या मागे बसून तो मार्केटयार्डच्या दिशेने तेथून पळून गेला. तो नेमका कोण होता, कशासाठी त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला, हे स्पष्ट होऊ शकले नाही. स्वारगेट पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे.
