Pune Crime News | पोलिसांविषयी बदनामीकारक रील सोशल मीडियावर टाकून महिला पोलिसांना अश्लिल शिवीगाळ करणार्या महाराष्ट्र विकास मीडियातील पत्रकारावर गुन्हा दाखल, खंडणी बरोबर तडीपारीची झाली होती कारवाई
पुणे : Pune Crime News | माहिती अधिकारात माहिती न दिल्याने पोलिसांविषयी खोटे व बदनामीकारक वक्तव्य करुन वारंवार फोन करुन संभाषणाचे रील सोशल मीडियावर टाकून पोलिसांविषयी अप्रितीची भावना चेतविणार्या महाराष्ट विकास मीडियातील पत्रकार म्हणविणार्यासह दोघांवर कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
महेश कामत आणि काशीराम बाबु विचारे (रा. निलकांत, कैलासनगर, शिवाजीनगर, अंबरनाथ ईस्ट) असे गुन्हा दाखल केलेल्यांचे नाव आहे. आरोपींविरुद्ध बदलापूर पोलीस ठाण्यात २०१७ व २०१८ मध्ये खंडणी, धमकाविणे देणे असे चार गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याला २०१८ मध्ये तडीपार करण्यात आले होते.
याबाबत महिला अंमलदारांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश कामत याने कोथरुड पोलिसांकडे एका व्यक्तीविषयी माहिती अधिकारात माहिती मागितली होती. परंतु, कायद्यानुसार अशी माहिती देता येत नसल्याचे पोलिसांनी कळविले होते. त्याचा महेश कामत याला राग होता. फिर्यादी महिला अंमलदार या कोथरुड पोलीस ठाण्यात ड्युटीवर असताना ३० ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता महाराष्ट्र विकास मीडियामधील महेश कामत असे नाव सांगणार्याने पोलीस ठाण्यात फोन करुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप देशमाने यांच्याबद्दल अश्लिल शिवीगाळ केली. कोथरुड पोलिसांबद्दल खोटे व बदनामीकारक व अब्रुनुकसानी कारक वक्तव्य करुन वारंवार फोन केला. महिला अंमलदार यांच्याशी काही वेळ बोलण्यास विनंती करुन त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले आहे.
या संभाषणामधील अश्लिल शिवीगाळ, पोलिसांबद्दल केलेले खोटे व बदनामीकारक मजकूर तसेच या संभाषणामधील इतर काही भाग असलेले ऑडिओ क्लीप असलेले रील तयार केले. हे रील त्याच्या इन्स्टाग्राम खात्यावर प्रसारीत करुन जनतेमध्ये पोलिसांबद्दल अप्रितीची भावना चेतविणारे कृत्य केले. ते करण्याकरीता काशीराम विचारे यांनी चिथावणी दिली, म्हणून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक करिश्मा शेख तपास करीत आहेत.
