Local Body Elections In Maharashtra | मतदार याद्यातील गोंधळावर राज्य निवडणूक आयोगाचे शिक्कामोर्तब; हरकती व सूचना करण्यास 3 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ, 22 डिसेबरला मतदार याद्या अंतिम होणार
पुणे : Local Body Elections In Maharashtra | महापालिका निवडणुकीसाठीच्या मतदार याद्यांमध्ये मोठ्याप्रमाणावर गोंधळ निर्माण झाल्याने राज्य निवडणूक आयोगाने मतदार याद्यांवरील हरकती व सूचना मागविण्याची मुदत ३ डिसेंबर पर्यंत तर मतदार याद्या अंतिम करण्याची मुदत २२ डिसेंबरपर्यंत वाढविली आहे. मतदार याद्या अंतिम होण्यास तब्बल दहा दिवसांनी मुदतवाढ दिल्याने महापालिकेच्या निवडणुका जानेवारी अखेरपर्यंत तरी होणार ? यासंदर्भातील तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी प्रारुप मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. पुण्यासह बहुतांश महापालिकांमध्ये प्रारुप मतदार याद्यांमध्ये मोठ्याप्रमाणावर गोंधळ निर्माण झाल्याचे हजारो तक्रारी येत आहेत. अनेक ठिकाणी वर्षानुवर्षे एकाच यादीत असलेल्या कुटुंबातील अर्धी नावे शेजारील प्रभागांमध्ये गेली आहेत. अनेकांची नावेच उडवण्यात आली आहेत. अनेक प्रभागांमध्ये ही संख्या अगदी काहीशेपासून हजारांमध्ये आहे. महापालिकांना उपलब्ध करून दिलेल्या प्रारुप मतदार याद्यांची किंमत खूप असल्याने सर्वसामान्य मतदारांना खातरजमा करण्यात अडचणी येत आहेत. केवळ इच्छुक उमेदवारांनी खरेदी केलेल्या आणि त्यांच्या तपासणीमध्ये आढळलेल्या त्रुटींचे प्रमाण इतके मोठे आहे. प्रत्यक्षात प्रत्येक नागरिकाने यादी तपासली तर ही संख्या लाखांमध्ये जाण्याची शक्यता आहे. मतदार याद्यांतील घोळावर सत्ताधारी पक्षांसह विरोधी पक्षाच्या इच्छुकांनी आणि नेत्यांनीही आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या आहेत. परंतू मतदार यादीतील नावावर हरकत घ्यायची असेल तर संबधित मतदारानेच वैयक्तिकरित्या नोंदवावी, असा नियम असल्याने अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागणार असलयाचा आक्षेपही घेण्यात आला आहे.
राज्यभरातील सर्वच महापालिकांमधून मोठ्याप्रमाणावर तक्रारी येउ लागल्यानंतर निवडणूक आयोगाने मंगळवारी स्थानीक प्रशासनाला स्वत: पुढाकार घेउन या त्रुटी दूर करण्याचे अधिकार दिले आहेत. तर आज निवडणूक आयोगाने मतदार यादीवरील हरकती व सूचनांची मुदत २७ नोव्हेंबर ऐवजी ३ डिसेंबरपर्यंत वाढविली आहे. तसेच अंतिम मतदार यादी १२ डिसेंबर ऐवजी २२ डिसेंबर रोजी अंतिम करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे निवडणूक आयोगाला देखिल मतदार याद्यातील त्रुटींचे गांभीर्य समजले असून त्यामुळेच सुधारीत कार्यक्रम जाहीर केल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, पुणे महापालिकडे आज संध्याकाळपर्यंत ३ हजार ४४३ नागरिकांनी हरकती नोंदविल्या आहेत.
निवडणूक पुढे जाणार !
ओबीसी आरक्षणामुळे लांबलेल्या स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावणेचार वर्षांपासून लांबल्या आहेत. जूनमध्ये न्यायालयाच्या निकालानंतर निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात नगर परिषद आणि नगर पालिकांच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुका येत्या २ डिसेंबरला पार पडतील. यानंतर जिल्हा परिषदा आणि महापालिकांच्या निवडणुका लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली असून महापालिका निवडणुकीची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे. न्यायालयाने ३१ जानेवारीपुर्वी सर्व निवडणूका उरकण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, महापालिका निवडणुकीच्या मतदार याद्यांमध्ये मोठ्याप्रमाणावर गोंधळ वाढल्याने मतदार याद्या अंतिम करण्याचा कालावधी २२ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आला आहे. यानंतर निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. २२ डिसेंबरनंतर एका आठवड्यात निवडणुका झाल्यातर जानेवारी अखेरपर्यंत निवडणुका होतील. परंतू आणखी विलंब लागल्यास बारावी आणि दहावीच्या परीक्षेनंतरच त्या होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
