Pimpri Police News | निष्काळजीपणे वापर केल्याने पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दोघांचे शस्त्र परवाने केले रद्द; 58 जणांना नाकारले शस्त्र परवाने
पिंपरी : Pimpri Police News | शस्त्र परवाना घेतल्यानंतर निष्काळजीपणे शस्त्र हाताळून स्वत: जखमी झाले तसेच गुन्ह्यांची माहिती लपवून शस्त्र परवाना मिळविलेल्या दोघांचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी शस्त्र परवाने रद्द केले आहेत. तसेच नवीन शस्त्र परवाना मागणार्या ५८ जणांना परवाना नाकारण्यात आला आहे.
गँगस्टर नीलेश घायवळ याचा साथीदार अजय सरोदे याने बनावट कागदपत्रे दाखल करुन शस्त्र परवाना मिळविल्याचे निष्पन्न झाले आहे.
चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परवानाधारक प्रविण सुरेश लुक्कर यांच्याविरुद्ध निगडी पोलीस ठाण्यात ३ गुन्हे व पुणे सत्र न्यायालयात १ क्रिमिनल केस दाखल आहेत. त्यापैकी १ गुन्हा व १ क्रिमिनल केस अद्यापपर्यंत न्यायप्रविष्ट आहे. प्रविण लुक्कर यांनी शस्त्र परवाना मिळविण्याकरीता सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात फक्त १ गुन्हा दाखल असल्याचे नमूद केले होते. इतर २ गुन्हे व १ क्रिमिनल केस दाखल असल्याची माहिती लपविली होती.
कुरळी गावात राहणारे परवानाधारक मयुर गुलाब सोनवणे हे त्यांच्या घरी रिव्हॉल्व्हर बाळगत असताना निष्काळजीपणामुळे त्यांचे रिव्हॉल्व्हरमधून १ राऊंड फायर होऊन त्यांचे स्वत:च्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांच्याविरुद्ध महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शस्त्राचा निष्काळजीपणे वापर केल्याने त्यांचा शस्त्र परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना सादर करण्यात आला होता.
हे दोन्ही परवाने पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी रद्द केले.
यापूर्वी परवान्यावरील शस्त्रांचा गैरवापर करणारे परवानाधारक संतोष दत्तात्रय पवार, संतोष पांडुरंग कदम, दिनेश बाबुलाल सिंग आणि गणपत बाजीराव जगताप यांचे देखील शस्त्र परवाने रद्द केले आहे. २०२५ मध्ये पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी एकूण ६ शस्त्र परवानाधारक यांचे शस्त्र परवाना रद्द केलेले आहेत.
नवीन शस्त्र परवाना मिळविण्यासाठी पोलीस आयुक्तांकडे केलेल्या अर्जापैकी ऑक्टोंबर/नोव्हेंबर २०२५ मध्ये एकूण ४१ जणांना शस्त्र परवाने नाकारले आहे. या प्रकरणाची प्राथमिक चौकशी केली असता या व्यक्तींना शस्त्र परवाने मंजुर करण्यासाठी कोणतेही सबळ कारण अथवा आधार नसल्याचे आढळून आले आहे. यापूर्वी शस्त्र परवाना मिळविण्यासाठी अर्ज केलेल्यांपैकी १७ जणांना शस्त्र परवाने नाकारलेले आहेत. या वर्षात पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी ५८ जणांना शस्त्र परवाने नाकारले आहेत.
