Pune Crime News | पुणे : ‘लग्न कर किंवा २ लाख दे’ नाहीतर बलात्काराचा गुन्हा करण्याची धमकी; वकिल असल्याचा दावा करणार्या कोथरूडच्या ‘त्या’ महिलेवर खंडणीचा दुसरा गुन्हा
पुणे : Pune Crime News | अगोदर ओळख वाढवून कोर्टाच्या केसमध्ये मदत करण्याचा बहाणा करुन जवळीक वाढवून लग्नाची मागणी घालणे, त्याला नकार दिल्यास २ लाख रुपयांची खंडणीची मागणी करणे, पैसे न दिल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करणे, अशा प्रकारे तरुणांना ब्लॅकमेल करण्याच्या दुसरा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी मुंढवा येथील एका ३७ वर्षाच्या तरुणाने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी कोथरुड येथे राहणार्या ३८ वर्षाच्या महिलेवर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार घोरपडीतील बी टी कवडे रोडवर १५ सप्टेंबर २०२५ ते १ डिसेंबर २०२५ दरम्यान घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणासोबत या महिलेने ओळख वाढविली. त्या हायकोर्टात वकील असल्याचे सांगून फिर्यादीवर त्यांच्या पत्नीने दाखल केलेल्या केसेसमध्ये मदत करते, असे सांगून जवळीक वाढविली. फिर्यादी यांनी लग्नास नकार दिला म्हणून फिर्यादी व त्यांच्या आईला कॉल करुन अश्लिल शिवीगाळ केली. तू माझ्या सोबत लग्न कर अथवा मला २ लाख रुपये दे, नाहीतर मी तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करते, म्हणून धमकी दिल्याचे फिर्यादी यांनी म्हटले आहे. मुंढवा पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर तपास करीत आहेत.
यापूर्वी गडहिंग्लज येथील एका तरुणाने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यात याच महिलेने वेळोवेळी घरी येऊन जवळीक साधून त्यांना काशी विश्वनाथ येथे घेऊन गेली होती. त्याला सोन्याच्या अंगठीसह काही वस्तू भेट दिल्या होत्या. त्यानंतर लग्नाची मागणी घातली. त्याला नकार दिल्याने २ लाखांची खंडणी मागितली व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती.
