Pune Crime News | भावाला पोलीस करण्यासाठी लेखी परीक्षेला बसणार्‍या पिंपरीतील पोलीस उपनिरीक्षकाला आर्थिक गुन्हे शाखेने केली अटक, 9 वर्षांनंतर गुन्हा उघडकीस

Pune Crime News | Pimpri Police Sub-Inspector arrested by Economic Offences Wing for appearing in written exam to make brother a police officer, crime exposed after 9 years

पुणे : Pune Crime News | पुणे शहर पोलीस दलात पोलीस भरतीसाठी २०१६ मध्ये लेखी परीक्षा घेण्यात आली होती. भावाच्या नावावर तो लेखी परीक्षेला बसला. त्याने भावाला लेखी परीक्षेत पासही करुन दिले. परंतु, त्यांच्याविषयी तक्रार झाली. त्यातून डमी उमेदवार बसल्याने गुन्हा दाखल झाला. त्यामुळे दोघेही फरार झाले होते. अशा प्रकारे पोलीस भरतीत गैरप्रकार केल्याबद्दल ९ गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यान, त्याने परीक्षा देऊन ती पास होऊन तो पोलीस उपनिरीक्षक झाला. भावाला पोलीस करण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपनिरीक्षकाने लेखी परीक्षा दिली होती. ९ वर्षाने हा प्रकार उघडकीस आणण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी या पोलीस उपनिरीक्षकाला अटक केली आहे.

सुप्पडसिंग शिवलाल गुसिंगे Suppadsingh Shivlal Gusinge (रा. कौचलवाडी, रोहिलागड, ता. अंबड, जि. जालना) असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. त्याचा भाऊ गजानन शिवलाल गुसिंगे याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तोतयेगिरी, फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे, कट रचणे, तसेच परीक्षांमधील गैरप्रकारास प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर २४ एप्रिल २०१६ रोजी पोलीस भरती प्रक्रियेंतर्गत लेखी परीक्षा पार पडली होती. भरती प्रक्रियेत गजानन गुसिंगे उमेदवार होता. त्याने ५ आणि ६ एप्रिल २०१६ रोजी मैदानी चाचणी दिली होती. त्यानंतर २४ एप्रिल २०१६ रोजी लेखी परीक्षा दिली.

या परिक्षेचे व्हिडिओ शुटिंग करण्यात आले होते. त्यात गजानन गुसिंगे हा पास झाला. त्याच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रारी आल्याने पोलिसांनी या व्हिडिओ शुटिंगची पडताळणी केली असता मैदानी परीक्षा देणारा व लेखी परीक्षा देणारा हे वेगवेगळे उमेदवार असल्याचे व्हिडिओ शुटींगमध्ये दिसून आले. त्यानंतर बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. अशाच प्रकारे पोलीस भरतीच्या वेळी गैर प्रकार केल्याने ९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ते प्रलंबित आहेत. मुळ उमेदवार आणि डमी उमेदवार यांचा शोध घेण्यासाठी गेल्या ९ वर्षात पोलीस अनेकदा त्यांच्या गावी जाऊन आले. परंतु, ते मिळून आले नाहीत.

सहायक पोलीस निरीक्षक दादासाहेब पाटील यांच्याकडे जून २०२५ हा गुन्हा तपासासाठी आला होता. आरोपी गजानन याच्या ऐवजी लेखी परीक्षा देणारा तोतयाचा शोध घेत असताना लेखी परीक्षेदरम्यान काढण्यात आलेल्या व्हिडिओवरुन आरोपीचा फोटो प्राप्त झालेला होता. हा फोटो साक्षीदाराला दाखविण्यात आला. त्याने गजानन याचा सख्खा भाऊ सुप्पडसिंग शिवलाल गुसिंगे हा असल्याचे सांगितले.

सुप्पडसिंग गुसिंगे हा पोलीस दलात उपनिरीक्षक म्हणून रुजू झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी पोलीस महासंचालक कार्यालयातून माहिती मिळाली की, सुप्पडसिंग गुसिंगे याची २०२३ मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून नेमणूक झालेली असून तो पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात नियुक्तीला आहे. त्यानंतर त्याचा शोध घेतला असता तो राज्य राखीव दल गट ७ मधील दौंड येथे आहे. त्यानंतर त्याला तेथून अटक करण्यात आली.

आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपी सुप्पडसिंग याचा भाऊ गजानन याचा शोध घ्यायचा आहे. दोघांनी भरती प्रक्रियेतील बनावट कागदपत्रे, ओळखपत्र कोठून तयार केली. त्यादृष्टीने तपास करायचा असून आरोपीला पोलीस कोठडी द्यावी, अशी विनंती सहायक पोलीस निरीक्षक दादासाहेब पाटील, सरकारी वकील श्रीधर जावळे यांनी केली. न्यायालयाने ५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली.

You may have missed