Pune Crime News | काय सांगता ! होय, चक्क सेवानिवृत्त पोलीस अधिकार्याची पुण्यातील पत्रकाराकडून तब्बल दीड लाख रुपयांची फसवणुक; अवैध धंदे चालकांशी संगणमत करून माझ्याबद्दल खोटी तक्रार दाखल केली; राकेश राजू वाघमारे यांचा खुलासा
‘मी कामानिमित्त नेहमी मंत्रालयात जात असतो, मंत्रालयातील सर्व अधिकारी, आमदार यांच्यासोबत चांगले संबंध आहेत, मी बरेच कामे केली आहेत’
पुणे : Pune Crime News | महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात ७० वर्षापर्यंत सेवा करण्याच्या जी आर नुसार वयोमर्यादा गृह मंत्रालयातून वाढवून आणून देतो, असे सेवानिवृत्त पोलीस अधिकार्याला सांगून त्यांची दीड लाख रुपयांची फसवणुक करणार्या जनता न्युजच्या पत्रकारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत ७० वर्षाच्या सेवानिवृत्त पोलीस अधिकार्याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन पोलिसांनी राकेश वाघमारे (रा. हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १४ जून २०२४ ते २३ सप्टेंबर २०२४ दरम्यान घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पुणे शहर पोलीस दलात हडपसर पोलीस ठाण्यात कार्यरत असताना २००७ पासून ससाणेनगर येथील राकेश वाघमारे Rakesh Waghmare (जनता न्युज – Janta News) हा त्यांच्या ओळखीचा व परिचयाचा आहे. फिर्यादी सहाय्य्क पोलिस निरीक्षक म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्या आदेशावरुन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज येथे १७ डिसेंबर २०१७ ते २८ नोव्हेंबर २०२१ अखेर कोरोना काळात वरिष्ठ सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत होते. वयाची ६५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर महामंडळाचे तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी महाराष्ट्र शासनाचा ७० वर्षाचा जी आर डावलून त्यांना व इतरांना सेवानिवृत्त केले. इतरांना ७० वर्षीय वयाचे आदेशाप्रमाणे गृह विभाग मंत्रालय यांचेकडून आदेश प्राप्त झाल्याने त्यांना पुन्हा कर्तव्यावर हजर करुन घेतले. परंतु फिर्यादी यांना अर्ज करुनही पुन्हा हजर करुन घेतले नाही.
फिर्यादी व राकेश वाघमारे यांची भेट झाली असताना त्याने कामानिमित्त नेहमी मंत्रालयात जात असतो, मंत्रालयातील सर्व अधिकारी, आमदार यांच्यासोबत चांगले संबंध आहेत, मी बरेच कामे केली आहेत, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. गृहमंत्रालयात त्यांची फाईल ओ एस डी कौस्तुभ दिवसे यांच्याकडे प्रलंबित आहे,असे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर त्याने कौस्तुभ दिवसे यांच्याशी बोलणे झाले असल्याचे सांगून त्यांच्याकडून उपमुख्यमंत्री व पोलीस महासंचालक यांच्या नावाने त्यांच्याकडून अर्ज लिहून घेतला. अधिकार्यांना किमान १ लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. त्यांच्यावर विश्वास बसल्याने फिर्यादी यांनी राकेश वाघमारे याला १४ जून २०२४ रोजी १ लाख रुपये दिले. त्यानंतर त्याने जुलै २०२४ अखेर काम होईल, असा मेसेज करुन सांगितले. त्यानंतर १९ जून २०२४ रोजी गृह विभागाच्या कर्मचार्याच्या नंबरवर ५० हजार तातडीने पाठविण्यास सांगितले.
फिर्यादीने मुलीकडून ५० हजार रुपये घेऊन पाठविले. त्यांनी पैसे पाठविलेला नंबर कोणाचा आहे याची खात्री केल्यावर तो सुमेर परदेशी (रा. काळेपडळ ) याचा असून तो वाघमारे याचे जवळ पत्रकार म्हणून काम करीत असतो, असे समजून आले. त्यामुळे त्यांना शंका आली. तेव्हा राकेश वाघमारे याने तुमचे शिफारस पत्र पुढे पाठविले असल्याचा मेसेज करुन सांगितले. त्यानंतर तो वारंवार काम होत आले आहे, काळजी नसावी, असे मेसेज करुन सांगत असे. परंतु, फोन घेत नसे. ४ ऑक्टोंबर २०२४ रोजी राकेश वाघमारे याने मेसेज द्वारे कळविले की, दुपारी मुंबईला बोलावले आहे, कृपया खर्चासाठी १५ हजार रुपये पाठवावे, २ दिवस लागणार आहेत. त्यावर फिर्यादीने वडिलांचे निधन झाले आहे. माझ्याकडे पैसे नाहीत, असे कळविले. त्यानंतर वेळोवेळी त्याच्याशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याने आजपर्यंत उत्तर दिले नाही. शेवटी त्यांनी आता हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक रोकडे तपास करीत आहेत.
अवैध धंदे चालकांशी संगणमत करून माझ्याबद्दल खोटी तक्रार दाखल केली; राकेश राजू वाघमारे यांचा खुलासा
मी राकेश राजू वाघमारे (रा. ससाणे नगर, हडपसर, संपादक जनता न्यूज) महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ पुणे-मुंबई जिल्हाअध्यक्ष या पदांवरती काम करत असून एक जबाबदार पत्रकार म्हणून माझी समाजामध्ये प्रतिमा आहे.
हडपसर पोलीस स्टेशन अंतर्गत हडपसर गावांमध्ये आणि परिसरात विविध अवैध धंदे जसे जुगार, गांजा विक्री, दारू विक्री, सोरट, गुटखा विक्री यावर मी प्रत्यक्ष धाडी घालून फोटो व्हिडिओ घेऊन वार्तांकन करत असतो तसेच हडपसर पोलीस स्टेशनला या अवैध धंद्यांवर कारवाई व्हावी याकरता पाठपुरावा करत असतो. काही दिवसांपूर्वी हडपसर गावांमध्ये गांजा विक्री तीन पत्ती जुगार पत्त्यांचा क्लब चालविणाऱ्यांच्या निवासस्थानाजवळ असलेल्या अड्ड्यावर मी जाऊन व्हिडिओ शूटिंग केले. यावेळी संबंधितांनी मला धमकावले याबाबत मी हडपसर पोलीस स्टेशनला तक्रार केली आणि या अवैध अड्ड्यावर कारवाईची मागणी केली. त्यामुळे संबंधित अवैध धंदे चालविणाऱ्यांनी यांनी माझ्या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार देणारे निवृत्त पोलीस अधिकारी सनदी यांच्याशी अनेक वेळा बैठक घेऊन मला अडकवण्याचे षडयंत्र रचले.
सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सनदी हे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्या आदेशावरून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय मिरज या ठिकाणी कोरोना काळात वरिष्ठ सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत होते. सदर अधिकारी हडपसर पोलीस स्टेशनला कार्यरत असताना बातम्यांच्या निमित्ताने माझी त्यांची ओळख होती. विविध बातम्यांच्या आणि कामाच्या निमित्ताने माझे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आणि मुंबई मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आमदार मंत्री यांच्याकडे येणे जाणे असते.
कार्यक्रमांच्या निमित्तानेही भेटीगाठी होत असतात. त्याचे फोटो सोशल मीडियावर देखील मी टाकत असतो. हे पाहून सनदी यांनी आपला सेवा काल वाढवून मिळावा याकरता उपमुख्यमंत्री, पोलीस महासंचालक, गृह मंत्रालयातील ओएसडी यांच्याकडे पाठपुरावा करण्यास सांगितले. योग्य ते अर्ज देखील त्यांच्या नावाने दाखल करण्यास सांगितले. संपूर्ण पुणे जिल्ह्यात मी जनता न्यूज चॅनलच्या माध्यमातून पत्रकारिता करत असल्याने त्यांना माझा व्यवसाय सोडून मला मुंबईला जाणे शक्य होणार नाही. तेव्हा त्यांनी स्वतंत्र गाडी, मुंबईमध्ये राहणे, हॉटेलमधील मुक्काम, जेवण-खाणे, येण्या-जाण्याचा खर्च म्हणून 50 हजार रुपये ऑनलाईन दिले. याचा वेळोवेळी मी खर्च झाल्याचा हिशोब त्यांना तोंडी देखील सांगितला.
योग्य तो पाठपुरावा करूनही शासकीय नियमांमध्ये सनदी यांचे काम बसत नसल्याने त्यांचे अर्ज फेटाळले गेले. त्यांनी वारंवार माझ्याकडे खर्चापोटी त्यांनी दिलेल्या 50000 ची मागणी केली. नंतर पैसे मिळत नसल्याने शिवीगाळ केली धमक्या दिल्या आणि सांगीतले की मी पोलिस होतो. आता 50 हजाराचे दीड लाख रुपये मला दे नाही तर मी गुन्हा दाखल करतो, अवैध धंदे चालक हे सनदी यांचे जुने मित्र असल्याने त्यांना आमचा विषय माहीत होता. तसेच हडपसर पोलीस स्टेशन विरोधात अवैध धंद्यांवर कारवाई करत नसल्याने मी पुणे शहर पोलीस आयुक्तांकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी देखील दाखल केल्या होत्या.
त्यामुळे सर्वजण त्रस्त होते सर्वांनी षडयंत्र रचून मी दीड लाख रुपये सनदी यांच्याकडून घेतल्याची तक्रार संगणमताने हडपसर पोलीस स्टेशनला देण्यात आली. यावर मी पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडे लेखी त्यावेळी तक्रार केली होती. तेव्हा माझे जाबजबाब घेण्यात आला. पण त्यांच्या गुन्हा दाखल नका करू असे सांगत पोलिस निरीक्षक संजय मोघले यांनी सेटलमेंट करण्यास सांगितले.मी माझ्या कायदेशीर सल्लागारांसोबत सल्लामसलत करत असून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची पावले उचलत आहे.
