Pune ACB Trap Case | 8 कोटींची लाच मागून 30 लाखांची लाच घेताना सोसायटीचा लिक्विडेटर, ऑडिटरला अँटी करप्शन ब्युरोने रंगेहाथ पकडले
पुणे : Pune ACB Trap Case | धनकवडी येथील एकता सोसायटीवर नेमलेल्या लिक्विडेटर आणि ऑडिटरने तब्बल ८ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने या ८ कोटींपैकी ३० लाख रुपयांचा पहिला हप्ता घेताना सापळा रचून अटक केली आहे. ८ कोटी रुपयांची लाच मागण्याचा हा राज्यातील सर्वाधिक लाच मागण्याचा पहिलाच प्रकार असावा.
लिक्विडेटर विनोद माणिकराव देशमुख Vinod Manikrao Deshmukh (वय ५०, रा. सिंहगड दर्शन सोसायटी, वडगाव खुर्द, धायरी फाटा) आणि ऑडिटर भास्कर राजाराम पोळ Bhaskar Rajaram Pol (वय ५६, रा. सुश्रुत रेसिडेन्सी, गजानन महाराज मंदिराजवळ, नर्हे गाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ही कारवाई तक्रारदार यांच्या शनिवार पेठ कार्यालयासमोर ५ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आली.
तक्रारदार हे धनकवडी येथील एकता सहकारी सोसायटीचे नवीन सभासद आहेत. तक्रारदारांसोबत इतर ३२ नवीन सभासद आहेत की ज्यांनी २००५ मध्ये जुन्या सभासंदाकडून एकता सहकारी सोसायटीचे शेअर विकत घेऊन नवीन सभासदत्व घेतले होते. पंरतु, २०२० मध्ये मुळ सभासद आणि नवीन सभासद यांच्या मध्ये सभासदत्वावरुन वाद होऊन तो सहकार विभागाकडे गेला. सहकार विभागाने या सोसायटीवर प्रशासक नेमले. प्रशासकाने मुळ सभासद व नवीन सभासद यांच्याकडे चौकशी करुन एक अहवाल सहकार विभागाकडे सादर केला. त्या अहवालानुसार सहकार विभागाने ती सोसायटी लिक्विडेशनमध्ये काढल्याचे जाहीर केले. सहकार विभागाकडून या सोसायटीवर २०२४ मध्ये विनोद देशमुख याची लिक्विडेटर म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे.
तक्रारदार व इतर ३२ नवीन सभासदांनी २०२३ मध्ये त्यावेळी प्रशासक असलेले ऑडिटर भास्कर पोळ यांच्या नावे अर्ज करुन त्यामध्ये शेअर सर्टिफिकेट मिळावेत असा विनंती अर्ज केला होता. भास्कर पोळ याने त्या विनंती अर्जावर कार्यवाही करुन तक्रारदार सोडून इतर ३२ नवीन सभासदांचे अर्ज निकाली काढले. परंतु, तक्रारदार हे सुनावणीसाठी उपलब्ध नसल्याने त्यांचा विनंती अर्ज प्रलंबित ठेवला. सप्टेंबर २०२५ मध्ये तक्रारदार त्यांच्या विनंती अर्जाबाबत ऑडिटर व तात्कालीन प्रशासक भास्कर पोळ यांच्याकडे जाऊन चौकशी केली. त्यावेळी भास्कर पोळ याने तक्रारदार व इतर ३२ सभासद यांना शेअर सर्टिफिकेट मिळवून देण्यासाठी स्वत:साठी व सध्या लिक्विडेटर म्हणून कार्यरत असलेले विनोद देशमुख याच्यासाठी ३ कोटी रुपयांची लाच मागितली. भविष्यात होणार्या लिलाव प्रक्रियेमध्ये या सहकारी सोसायटीची जागा तक्रारदार सांगतील त्या व्यक्तीला देण्यासाठी ५ कोटी रुपये असे एकूण ८ कोटी रुपयांची लाच मागितली. याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे ५ डिसेंबर रोजी तक्रार प्राप्त झाली.
या तक्रारीची पडताळणी ५ डिसेंबर रोजीच करण्यात आली. त्यात भास्कर पोळ याने तक्रारदाराचे काम करुन देण्यासाठी स्वत:साठी व लिक्विडेटर देशमुख याच्यासाठी ३ कोटी रुपये व लिलाव टेंडर प्रक्रियेमध्ये तक्रारदार सांगतील त्या व्यक्तीस टेंडर देण्यासाठी ५ कोटी रुपये असे एकूण ८ कोटी रुपयांची लाच मागून अॅडव्हान्स म्हणून ३० कोटी रुपये मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर सापळा कारवाईदरम्यान लिक्विडेटर विनोद देशमुख हा तक्रारदार यांच्या शनिवार पेठेतील कार्यालयासमोर आले. तक्रारदाराकडे लाचेबाबत सकारात्मक बोलणी करुन तक्रारदाराच्या वरील कामासाठी अॅडव्हान्स म्हणून ३० लाख रुपयांची लाच रक्कम स्वीकारताना विनोद देशमुख आणि भास्कर पोळ यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त निता मिसाळ व त्यांचे सहकारी यांनी केली. पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर तपास करीत आहेत.
