Pune Crime News | प्रेमविवाह केल्यानंतर हुंड्यासाठी होत असलेल्या छळाला कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; वाघोली पोलिसांनी पती, सासुला केली अटक

Pune Crime News | Married woman commits suicide by hanging after being harassed for dowry after love marriage; Wagholi police arrest husband, mother-in-law

पुणे : Pune Crime News | स्पर्धा परिक्षेची तयारी करत असताना तीन वर्षाच्या प्रेमसंबंधानंतर दोन्ही घरातील लोकांनी त्यांचा विवाह करुन दिला. त्यानंतर माहेरहून पैसे आणण्याची सातत्याने मागणी करुन मानसिक व शारीरीक छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ‘‘तू जर आमच्याकडे आली व मेली तर आम्ही जोखमदार राहणार नाही, असे लिहून आण’’ असे पती आणि सासु बळजबरी करीत असल्याचे समोर आले आहे. वाघोली पोलिसांनी पती व सासु यांना अटक केली आहे.

मनिषा किसन वीर (वय ३२, रा. लाडोबा वस्ती, केसनंद) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. पती रामचंद्र दिलीप बुरटे (वय ३५) आणि सासु सुमिती दिलीप बुरटे (वय ५०, दोघे रा. लाडोबा वस्ती, केसनंद) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ही घटना केसनंद येथील राहत्या घरात ३ डिसेंबर २०२५ रोजी रात्री दहा वाजता घडली.

याबाबत मीरा किसन वीर (वय ६०, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी मनिषा ही स्पर्धा परिक्षेची तयारी करत होती. तिचे रामचंद्र बुरटे याच्याबरोबर २०१७ पासून प्रेमसंबंध होते. रामचंद्र बुरटे याचा ट्रव्हल्सचा व्यवसाय आहे. त्यांनी प्रेमसंबंधाचे घरी सांगितल्यानंतर दोन्ही घरातल्यांनी त्यांचा विवाह निश्चित केला. त्यानंतर रामचंद्र बुरटे याने विमाननगर येथील घराचे बांधकाम करायचे आहे, त्यासाठी १ लाख रुपयांची मागणी केली. त्यांनी ५० हजार रुपये उसने दिले. २२ फेब्रुवारी २०२१ रोजी चंदननगर येथील रामचंद्र हॉल येथे त्यांचा विवाह झाला. त्यांना एक मुलगी झाली. मुलगी झाल्यानंतर पती व सासु तिला लग्नात काहीच हुंडा दिला नाही. आता पैसे तरी द्यायला सांग, असे म्हणून गाडीचे दोन हप्ते थकले आहेत, त्यासाठी माहेरहून पैसे घेऊन येण्यास सांगत होते.

१२ डिसेंबर २०२४ रोजी मनिषा हिला एकटीला ठेवून तिचा पती व सासु कोकणात निघून गेले होते. त्यांनी मनिषाला माहेरी आणले. त्यानंतर त्यांनी तिला सासरी घेऊन गेले परंतु, सासुने दार उघडले नाही. पती रामचंद्र याने तु जर आमच्याकडे आली व मेली तर आम्ही जोखमदार राहणार नाही. तु जर मेली तर तुझा भाऊ व तुझी आई जबाबदार राहिल, असे लिहून आण, तोपर्यंत तुला घरी घेणार नाही, असे फोनवरुन धमकावले. ते तक्रार देण्यासाठी वाघोली पोलीस ठाण्यात गेले. पोलिसांनी तिच्या पतीला बोलावून दोघांनाही समजावून सांगून नांदवण्यास पाठविले.

त्यानंतर काही दिवसांनी रामचंद बुरटे हा शिवाजीनगर कोर्टात मनिषाला घेऊन गेला व तेथे तिच्याकडून स्टॉम्प पेपरवर लिहून देण्यास बळजबरी करु लागला. तिने नकार दिला. ती टाटा एजाकी कंपनीत काम करु लागली. तिचा सर्व पगार रामचंद्र काढून घेत होता. कंपनीने कामाचे १२ तास केल्याने तिने ३० नोव्हेबर २०२५ रोजी काम सोडून दिले. त्यानंतर ३ डिसेंबर रोजी तिला पती व सासुने मारहाण केली. तेव्हा तिने आपल्या भावाला फोन करुन सांगितले व फोन कट केला. भावाने शेजारी राहणार्‍यांना ही गोष्ट सांगितली. त्यांनी पाहिले तर दरवाजा बंद होता. आजू बाजूच्या लोकांनी दरवाजा तोडला. तोपर्यंत मनिषाने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सहायक पोलीस निरीक्षक विजय चंदन तपास करीत आहेत.

You may have missed