Pune Crime News | भारत सरकारच्या सेंटर फॉर मटेरिअल्स फॉर इलेक्ट्रोनिक्स टेक्नोलॉजी कंपनीच्या महासंचालकाच्या नावाने अधिकार्यांना बनावट ई मेल पाठवून फसवणुकीचा प्रयत्न
पुणे : Pune Crime News | इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाच्या अधिपत्याखाली काम करणार्या सेंटर फॉर मटेरिअल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नोलॉजी (सी मेट) च्या महासंचालकांच्या नावाने २४ अधिकार्यांना बनावट ई मेल पाठवून त्यांच्याकडून कार्यालयीन तसेच वैयक्तिक माहिती मिळवून भुलविण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून आले आहे. या संस्थेमध्ये भारताच्या संरक्षण तसेच इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाच्या संबंधाने वैज्ञानिक कामकाज चालते. ही देशाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची संस्था असल्याने तिच्या महासंचालकाच्या नावाने बनावट ई मेल पाठवून फसवणुकीचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे.
याबाबत पाषाण येथील या संस्थेतील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुनित बारसु राणे (वय ५७, रा. नालंदा गार्डन, बाणेर रोड) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना १२ ऑगस्ट ते २८ ऑक्टोंबर २०२५ दरम्यान घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेंटर फॉर मटेरिअल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नोलॉजी (सी मेट) चे प्रमुख डॉ. श्री आर रथिश हे महासंचालक आहेत. त्यांच्या नावाने संस्थेतील २४ अधिकार्यांना अज्ञात व्यक्तीने संस्थेशी संबंधित ई मेलवरुन ईमेल केले आहेत.
या ईमेलमध्ये ‘‘मला तुम्हाला सहा लाख पंचावन्न हजार रुपयांचे (रु. ६,५५,०००/-) आरटीजीएस पेमेंट करायचे आहे. बँक खात्याची माहिती तुम्हाला दिली तर ते किती लवकर प्रक्रिया करता येईल. मी मिटिंगमध्ये आहे. तुम्ही करू शकाल का? कृपया मला परत ईमेल करा जेणेकरून मी बँक खात्याच्या लाभार्थीची माहिती येथे शेअर करू शकेन. शुभेच्छा, डॉ. आर. रथिश, असा मजकूर होता. ‘I would like you to make an RTGS Payment of Six Lakh Fifty-Five Thousand Rupees Only (Rs 6,55,000/-) how soon can it be processed if the Bank Account details are provided to you. I’m in meeting, could you please email me back so that i can share the Bank account beneficiary details here.’ Best Regards, Dr.R.Ratheesh
दुसर्या ई मेलमध्ये ‘‘तुम्ही उपलब्ध आहात का? कृपया तुमचा व्हाट्सअॅप नंबर द्या. काही तातडीच्या कामासाठी.’’असे नमूद केलेले आहे. Are you available? Kindly drop me your WhatsApp number.For quiet urgent matter
ही संस्था भारत सरकारच्या अधिपत्याखाली काम करत आहे. या संस्थेत संवेदनशील कामकाज चालत असल्याने, संस्थेतील प्रमुख अधिकारी यांच्या नावाने खोटी ओळख तयार करुन अज्ञात व्यक्तीने त्यांच्या नावाने भासवणारा ई मेल पाठवून पैशांची व बँक तपशीलाची माहिती मागणी करणे, तसेच अधिकार्यांना व्हाट्सअॅप क्रमांकाची मागणी करुन कार्यालयातील अथवा वैयक्तिक माहिती मिळविण्यासाठी भुलविण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे. ही बाब गंभीर असल्याने संस्थेचे प्रमुख डॉ. श्री आर रथिश यांनी ३१ ऑक्टोंबर २०२५ रोजी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. त्यानंतर आता या अर्जाची दाखल घेऊन संस्थेच्या वतीने फिर्याद देण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक अश्विनी ननवरे तपास करीत आहेत.
