Pune Crime News | पुणे रेल्वे स्टेशनजवळ चैन स्नॅचिंग करणार्या कराडच्या दोघा अल्पवयीन चोरट्यांकडून बंडगार्डन पोलिसांनी सोन्याचे गंठण, दुचाकी असा अडीच लाखांचा माल केला जप्त
पुणे : Pune Crime News | पुणे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म ६ जवळून पायी जाणार्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावुन नेणार्या दोघा अल्पवयीन चोरट्यांना बंडगार्डन पोलिसांनी कराड येऊन ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २ गुन्हे उघडकीस आणून सोन्याचे गंठण व दुचाकी असा अडीच लाखांचा माल जप्त केला आहे.
अंजनी शाम अमोलिक (वय ५८, रा. सह्याद्रीनगर, धनकवडी) या २९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी पुणे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नं. ६ पासून ए आय एस एस एम एस कॉलेजकडे पायी जात होत्या. यावेळी दोघा चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मिनी मंगळसुत्र हिसका मारुन चोरुन नेले होते. बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांनी ५५ सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यातून पोलीस अंमलदार सारस साळवी व प्रकाश आव्हाड यांना हे आरोपी कराड तालुक्यातील नडशी गावातील राहणारे असल्याचे समजले.
पोलिसांनी त्यांना राहत्या घरातून ताब्यात घेतले. चौकशीत ते अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी चोरी केलेले सोन्याचे गंठण ज्या ठिकाणी गहाण ठेवले होते. त्या ठिकाणाहून गंठण हस्तगत करण्यात आले. बंडगार्डन पोलीस ठाण्यातील चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले असून सोन्याचे गंठण व अॅक्टीव्हा दुचाकी असा अडीच लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे.
ही कामगिरी अपर पोलीस उपायुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त संगिता आल्फोन्सो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, पोलीस निरीक्षक नीलकंठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता, मोहन काळे, पोलीस अंमलदार प्रदिप शितोळे, सारस साळवी, प्रकाश आव्हाड, महेश जाधव, ज्ञानेश्वर बडे, मनोज भोकरे, शिवाजी सरक, ज्ञानेश्वर गायकवाड यांनी केली आहे.
