Nilesh Ghaiwal | पुणे : निलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; घायवळ विरोधातील खटल्यात अॅड. शिशीर हिरे विशेष सरकारी वकील, पोलिसांचा प्रस्ताव
पुणे : Nilesh Ghaiwal | परदेशात पळून गेलेल्या गँगस्टर निलेश घायवळ याला न्यायालयाने फरार घोषित केले आहे. त्याचवेळी निलेश घायवळ याच्याविरुद्धच्या खटल्यासाठी ज्येष्ठ विधीज्ञ शिशीर हिरे यांची नियुक्ती करावी असा प्रस्ताव पोलिसांनी राज्य शासनाकडे पाठविला असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. (Nilesh Ghaiwal Gang)
निलेश घायवळ हा गेल्या काही महिन्यांपासून बनावट पासपोर्टवर परदेशात पळून गेला आहे. पोलिसांनी त्याचा पासपोर्ट रद्द केला आहे. तसेच इंटरपोलच्या सहाय्याने त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस काढली आहे.
निलेश घायवळ याचा साथीदार अजय सरोदे याला एजंट निलेश फाटक याने शस्त्र परवाना मिळवून दिला होता. अशा प्रकारे निलेश फाटक याने निलेश घायवळ याच्या १५ साथीदारांना शस्त्र परवाना मिळवून दिले आहेत. त्या सर्व शस्त्र परवान्याची चौकशी करण्यात सुरुवात केली आहे.
निलेश घायवळ याच्याविरुद्ध दाखल असलेल्या सर्व गुन्ह्यांसाठी अॅड. शिशीर हिरे यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी, असा प्रस्ताव पोलिसांनी गृह विभागाकडे पाठविला असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. त्याचबरोबर आर्म अॅक्ट तसेच बनावट नंबर प्लेट लावून फसवणुक केल्या प्रकरणातील दोषारोपपत्र लवकरच न्यायालयात दाखल करण्यात येणार असल्याचे अमितेश कुमार यांनी सांगितले.
मुख्य न्यायदंडाधिकारी के पी जैन -देसरडा यांनी नीलेश घायवळ याला नुकतेच फरार घोषित केले आहे. त्यामुळे निलेश घायवळ याच्या मालमत्ता सील करणे पोलिसांना सुकर होणार असल्याचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले.
