Pune PMC News | सुका कचरा सिमेंट कंपन्यांपर्यंत वाहून नेण्याच्या कामाला चवथ्यांदा मुदतवाढ; मर्जीतल्या ठेकेदारासाठी घनकचरा विभाग आणि वरिष्ठ अधिकार्‍यांचा आटापिटा

Pune PMC News | The work of transporting dry waste to cement companies has been extended for the fourth time; Solid Waste Department and senior officials struggle for the preferred contractor

पुणे : Pune PMC News |  शहरातील मिश्र कचर्‍यातून निर्माण होणारा सुका कचरा सिमेंट कंपन्यांपर्यंत वाहून नेण्याचे कंत्राट यावर्षी मार्चमध्येच संपले आहे. परंतू घन कचरा विभागाकडून वेळेत निविदा प्रक्रिया राबविली गेली नसल्याने दोन वेळा मुदतवाढ दिलेल्या कंपनीलाच आणखी मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव घन कचरा विभागाने स्थायी समितीपुढे ठेवला आहे. यामुळे घनकचरा विभाग ठराविक ठेकेदारासाठी पायघड्या घालत असून वरिष्ठांचे देखिल त्याला अभय असल्याचे दिसून येत आहे.

शहरातील विविध कचरा प्रक्रिया प्रकल्पांवर गोळा होणारा सुका कचरा सिमेंट कंपन्यांना इंधन म्हणून पुरविण्यात येतो. शहरातून दररोज अशा पद्धतीने निर्माण होणारा सुमारे 300 टन सुका कचरा सिमेंट कंपन्यांना पुरविण्यात येतो. यापैकी 150 टन सुका कचरा पुरविण्याचे कंत्राट आदर्श भारत इन्व्हायरो या कंपनीला एकवर्षासाठी देण्यात आले होते. या कंपनीला 875 रुपये मेट्रीक टन वाहतूक खर्च देउन देण्यात आलेली निविदा यावर्षी मार्चमध्येच संपली.परंतू वेळेत निविदा न काढल्याने तत्कालीन घनकचरा विभागाच्या उपायुक्तांनी या कामाची मुदत सप्टेंबर 2025 पर्यंत वाढविली.

परंतू निविदा प्रक्रियेस वेळ लागत असल्याने पुन्हा ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. विशेष असे की त्यावेळी या कंपनीला वाढीव कचरा वाहतुकीचे आदेशही देण्यात आले. परंतू कंपनीने वाढीव कचरा वाहून नेला नसल्याने निविदा शिल्लक असल्याचे सांगत पुन्हा एक महिना अर्थात नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. परंतू कुठलाही अडथळा नसतानाही घन कचरा विभागाची निविदाच निघाली नाही, त्यामुळे घनकचरा विभागाने पुन्हा दोन महिने मुदतवाढीचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मान्यतेसाठी ठेवला आहे. थोडक्यात पहिल्या कामाची मुदत मार्च मध्ये संपल्यानंतरही 9 महिन्यांत घन कचरा विभागाला सुका कचरा विल्हेवाटीच्या अत्यावश्यक कामाची निविदा काढता आली नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.

याही पेक्षा हे काम संबधित कंपनीकडेच राहावे यासाठी तत्कालीन घनकचरा विभाग प्रमुखांकडून जाणीवपूर्वक सुका कचरा सिमेंट कंपन्यांपर्यत वाहून नेण्याची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली नाही आणि त्याला वरिष्ठांचे अभय आहे? असा प्रश्न या मुदतवाढीच्या खेळाने  निर्माण झाला आहे.

You may have missed