Pune Crime News | बनावट औषध तयार करुन ते देशभर वितरीत करणाऱ्या वितरकांसह पुण्यातील औषध विक्रेते अक्षय हसमुख पुनिया, अमृत बस्तीमल जैन, मनिष अमृत जैन, रोहित पोपट नावडकर यांच्यावर गुन्हा दाखल

Pune Crime News | A case has been registered against drug dealers Akshay Hasmukh Punia, Amrit Bastimal Jain, Manish Amrit Jain, Rohit Popat Navadkar, along with distributors who manufactured fake medicines and distributed them across the country.

पुणे : Pune Crime News | सिक्कीम येथील औषध कंपनीचे औषध बिहारमधील परवाने मुदतबाह्य झालेल्या वितरकाच्या नावाने ट्रिप्सिन या औषधाची बनावट निर्मिती करुन ते देशभर विकले जात असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने उघडकीस आणले आहे. अन्न व औषध प्रशासनाने पुण्यातील औषध विक्रेत्यांसह ८ जणांवर गुन्हे दाखल करुन पुण्यातील मेडिकल दुकानातून २ लाख ७५ हजार रुपयांची बनावट औषधे जप्त केली आहेत.

याबाबत औषध निरीक्षक श्रीकांत विश्वासराव पाटील (वय ३९) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अक्षय हसमुख पुनिया Akshay Hasmukh Punia (अक्षय फार्मा – Akshaya Pharma, निंबाळकर तालीम चौक, सदाशिव पेठ), अमृत बस्तीमल जैन Amrit Bastimal Jain (आर्जस मेडिकल डिस्ट्रिब्युटर – Argus Medical Distributor, साईस्पर्श अपार्टमेंट, सदाशिव पेठ), मनिष अमृत जैन Manish Amrut Jain (आर्जस मेडिकल डिस्ट्रिब्युटर, साईस्पर्श अपार्टमेंट, सदाशिव पेठ), रोहित पोपट नावडकर Rohit Popat Navadkar (रिद्धी फार्मा – Ridhi Pharma, तराटे कॉलनी, कर्वे रोड, एरंडवणे), देवेंद्र यादव Devendra Yadhav Sinna Pharma (सिन्ना फार्मा, बी सी मेडिसिन मार्केट, नय्या गाव, पूर्व, लखनौ), उमंग अभय रस्तोगी Umang Abhay Rastogi (रजा बाजार, रस्तोगी टोला चौक, लखनौ, उत्तर प्रदेश), महेश गर्ग (अमिनाबाद, लखनौ, उत्तर प्रदेश), सोनी महिवाल (महिवाल मेडिको, भोरे गोपालगंज, बिहार) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त गिरीष हुकरे यांनी माहिती दिली. अन्न व औषध प्रशासनाला सिक्कीम येथील टेरेंट फार्मास्युटिकल्स (terrent pharmaceuticals) या कंपनीचे ट्रिप्सिन (trypsin chymotrypsin tablers (chymoral forte) या बनावट औषधाची पुणे शहरामध्ये विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्याअनुषंगाने १६ ऑक्टोंबर २०२५ रोजी औषध निरीक्षकांनी सदाशिव पेठेतील अक्षय फार्मा या दुकानातून औषधाच्या साठ्यामधून चाचणी व विश्लेषणासाठी नमुना घेतला. हे औषध सिक्कीम येथील टेरेंट फार्मास्युटिकल्स या कंपनीकडे तुलनात्मक अभ्यासासाठी पाठविण्यात आला. अक्षय फार्मा यांनी या औषधाची खरेदी आर्जस मेडिकल डिस्ट्रिब्युटर यांच्याकडून केल्याचे आढळून आले. आर्जस मेडिकल डिस्ट्रिब्युटर यांनी एरंडवणे येथील रिद्धी फार्मा यांच्याकडून खरेदी केल्याचे आढळून आले. १७ ऑक्टोंबर रोजी रिद्धी फार्माकडे चौकशी केल्यावर त्यांनी लखनौ येथील सेना फार्मा यांच्याकडून ही औषधे खरेदी केल्याचे आढळले.

औषध निरीक्षक श्रीकांत पाटील व विवेक खेडकर यांनी लखनौ येथे २४ ते २७ नोव्हेंबर २०२५ दरम्यान जाऊन तपास केला. सेना फार्मा यांच्याकडे तपासणी केली असता त्यांनी या औषधाची खरेदी बिहारमधील गोपालगंज येथील महिवाल मेडिको येथून केल्याचे स्पष्ट केले. त्यांनी उमंग रस्तोगी याला बिलाची २ लाख ३४ हजार ७२७ रुपये रक्कम रोखीने दिली. ही रक्कम उमंग रस्तोगी याने महेश गर्ग याला रोखीनेच हस्तांतरीत केली. सेना फार्मा यांना या औषधाचा साठा महेश गर्ग याने थेट पुरविल्याचे दिसून आले.

अन्न व औषध प्रशासनाने बिहारमधील गोपालगंज येथील सहायक ड्रग्ज कंट्रोलर यांच्याशी माहितीसाठी पत्रव्यवहार केला. या ड्रग्ज कंट्रोलर यांनी महिवाल मेडिको ही पेढी बंद असून त्यांचा परवाना २० नोव्हेंबर २०२४ रोजीच मुदतबाह्य झाल्याचे कळविले. दरम्यान, टेरेंट फार्मास्युटिकल्स, सिक्कीम यांना पाठविलेल्या औषध नमुन्याचा तुलनात्मह अभ्यास करुन त्यांनी हे औषध उत्पादित केलेले नसल्याचे व त्यांचे नसल्याचे पत्राद्वारे अन्न व औषध प्रशासनाला कळविले. त्याअनुषंगाने अन्न व औषध प्रशासनाने २ लाख ७५ हजार रुपयांचा बनावट औषधांचा साठा जप्त केला आहे.

या औषधाचे उत्पादन कोठे झाले व कोठे वितरण झाले याची चौकशी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक वाघमारे तपास करीत आहेत. बनावट औषधांची खरेदी व विक्री करणार्‍यांना औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० अंतर्गत ७ ते १० वर्षे तुरुंगवास व १० लाख रुपये दंडांची तरतुद कायद्यामध्ये आहे.

You may have missed