Pune Crime News | पुणे : दिवसा घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद; समर्थ पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरुन लावला तपास, 8 लाखांचा ऐवज केला जप्त (Video)
पुणे : Pune Crime News | मंगळवार पेठेतील बंद घराचे कुलूप तोडून सोन्या, चांदीचे दागिने, रोकड चोरुन नेणार्या चोरट्याला सीसीटीव्ही फुटेजवरुन समर्थ पोलिसांनी पकडले. चोरीचे दागिने विकण्याचा प्रयत्नात असलेल्या त्याच्या साथीदारालाही अटक केली.
सुनिल मल्हारी तलवारे Sunil Malhari Talware (वय ३८, रा. अजंठानगर मस्जिदजवळ, आकुर्डी) आणि शिवानंद दशरथ मोची ऊर्फ मोची मामा Shivanand Dashrath Mochi alias Mochi Mama (वय ४०, रा. भिमशक्तीनगर, मोरेवस्ती, चिखली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याबरोबरील अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
मंगळवार पेठेतील राहते घर बंद असताना १८ नोव्हेंबर रोजी चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील ७ लाख २९ हजार रुपयांचे सोन्याचे, चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेली होती. समर्थ पोलीस ठाण्यातील तपास पथक व गुन्हे शाखा समांतर तपास करीत होते. घटनास्थळावरील उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज तपासून तसेच गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सुनिल तलवारे व एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केले. चोरलेले दागिने विकण्यासाठी शिवानंद मोची याच्याकडे दिल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी शिवानंद मोची याचा पिपंरी चिंचवड परिसरात शोध घेऊन त्यालाही अटक केली.
पोलिसांनी गुन्ह्यात चोरलेले सोन्या चांदीचे दागिने तसेच १० हजार रुपये रोख असा एकूण ८ लाख ११ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या आरोपींनी खराडी, चंदननगर पोलीस ठाणे व महाड शहर पोलीस ठाण्याच्या परिसरात घरफोडीचे गुन्हे केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक चेतन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहन चोरी व दरोडत्त पथकाकडील सहायक पोलीस निरीक्षक बेरड, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे, पोलीस अंमलदार अमोल गावडे, इम्रान शेख, शरद घोरपडे, भाग्येश यादव, विक्रांत सासवडकर, विनायक येवले यांनी केली आहे.
