Pune Crime News | निनावी फोनमुळे ऊसतोड कामगाराच्या अल्पवयीन मुलीचे जबरदस्तीने झालेले लग्न आले उघड, वारजे पोलिसांनी केला महिला व तिच्या मुलावर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | पोलीस नियंत्रण कक्षाला आलेल्या एका निनावी फोनवरुन ऊसतोड कामगाराच्या १७ वर्षाच्या मुलीचा जबरदस्तीने विवाह लावल्याचे उघडकीस आले आहे. वारजे माळवाडी पोलिसांनी महिला व तिच्या मुलावर गुन्हा दाखल केला आहे.
सविता रामा शेंडगे (वय ४०) आणि आनंद रामा शेंडगे Anand Rama Shendage (वय १९, रा. महादेव मंदिराजवळ, अण्णाभाऊ साठे चौक, रामनगर, वारजे) व इतर अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत बाल विकास अधिकारी शितल मारुती कोकितकर (वय ४०, रा. कर्वेनगर) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार वारजे येथील रामनगरमधील अण्णाभाऊ साठे चौकातील महादेव मंदिरामध्ये १२ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे माळवाडी येथे एक ऊसतोड कामगार, पत्नी व मुलीसह राहतात. पती व पत्नी हे गावाकडे गेले होते. त्यावेळी त्यांच्या शेजारी राहणार्या सविता शेंडगे हिने तिचा मुलगा आनंद शेंडगे याच्याबरोबर महादेव मंदिरामध्ये तिचे जबरदस्तीने लग्न लावून दिले. ही बाब एका जागृत नागरिकाने निनावी फोन करुन पोलीस नियंत्रण कक्ष तसेच बाल विकास अधिकारी यांना कळविली. पोलीस महादेव मंदिरात पोहचले. तोपर्यंत लग्न लागले होते. पोलिसांनी या १७ वर्षाच्या मुलीला बाल विकास अधिकार्यांकडे हवाली केले. त्यांनी या मुलीच्या आईवडिलांशी संपर्क केला असता त्यांना याची काहीही माहिती नव्हती. या मुलीला सध्या बाल शेल्टरमध्ये ठेवण्यात आले आहे. वारजे माळवाडी पोलिसांनी बालविवाह प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक दिपाली लुगडे तपास करीत आहेत.
